राज्यातील शिक्षक भरतीसाठी आस लावून बसलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिक्षक भरतीसाठी 30 हजार रिक्त पदांची जाहिरात लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
गेल्या काही वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया रखडलेली होती. पण आता अखेर शिक्षक भरती प्रक्रियेला लवकरच मुहूर्त मिळणार असून 23 जिल्ह्यांतील रिक्त पदांच्या शिक्षक भरतीसाठी लवकरच जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यासंदर्भात तारीख जरी अद्याप निश्चित करण्यात आलेली नसली, तरी यासंदर्भात तातडीची पावलं राज्य सरकारकडून उचलण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील शिक्षण भरती प्रक्रियेसंदर्भातील संकेतस्थळ असलेल्या पवित्र संकेतस्थळामार्फत प्रक्रिया राबवली जाणार आहे असं ते यावेळी म्हणाले.