बीड - किरकोळ कारणावरून दोघात झालेल्या वादानंतर एकाने थेट आपल्या पिस्टल मधून गोळीबार केला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्या छातीत गोळी घुसली आहे. गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले आहे. ही घटना बीड शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पात्रुड गल्ली माळी वेस येथे रात्री साडे आकरा ते पावणे बाराच्या दरम्यान घडली. घटना घडल्यानंतर आरोपीने पोबारा केला. पोलिसांचे दोन पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहेत.
मनोज दत्ताराव जाधव (वय 35 वर्ष, रा. पाथरूड गल्ली, माळी वेस बीड) असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा मावस भाऊ आणि जखमी जाधव यांच्यात दि. 1 ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा ते पावणे बाराच्या दरम्यान किरकोळ वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाले. जखमी जाधवच्या दिशेने त्याच्या मावस भावाने थेट गोळी झाडली ही गोळी जाधव याच्या छातीत घुसली. पोलिसांच्या माहितीनुसार एक फायर करण्यात आला आहे. जखमी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतात आरोपीने तेथून पोबारा केला. जखमीला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगरला हलवण्यात आले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके, बीड शहर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख कुलकर्णी यांच्यासह बीड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीच्या शोधासाठी रात्रीच पोलिसांची दोन पदके पाठवण्यात आले आहेत. अद्याप आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने मात्र बीड शहरात मोठी खळबळ उडाली. गोळीबारानंतर उडलेली कॅप पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.