मुंबई -14 सप्टेंबरला झालेल्या पहिल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज (25 सप्टेंबर) विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडली. या सुनावणीमध्ये वेळापत्रक निश्चित होणार असले, तरी ही प्रक्रिया यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणी यावर्षी निकाल लागणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. आजच्या सुनावणीनंतर आता पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, या संभाव्य वेळापत्रक पत्रकात कागदपत्र तपासणी, त्याचबरोबर साक्ष नोंदवणे, उलट तपासणी मुद्द्यांचा समावेश असल्याने या प्रक्रियेत तीन महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन असल्याने त्या दरम्यानच्या कालावधीत सुनावणी होण्याची शक्यता धुसर असल्याने आता जानेवारी 2024 मध्ये निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्व दाखल याचिकांवर वेळापत्रक निश्चित होण्याची शक्यता
ठाकरे गटाकडून अनिल परब, अनिल देसाई, सुनील प्रभू, मुबंईतील आमदार उपस्थित आहेत. सुरवातीला दोन्ही गटाकडून म्हणणं ऐकून घेतलं जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर एकूण 34 याचिका आहेत. या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी वेळापत्रक निश्चित होणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांकडून दिरंगाई होत असल्याने ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यशैलीवर अत्यंत कडक शब्दात सुनावले होते. त्यानंतर सुनावणीसाठी वेग आला आहे. मागील सुनावणीत शिंदे गटाकडून कागदपत्रे मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. आजच्या सुनावणीनंतर सर्व दाखल याचिकांवर वेळापत्रक निश्चित होण्याची शक्यता आहे. सर्व याचिकांवर एकाचवेळी सुनावणी घेण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे घेण्यात आली आहे.
आज होत असलेल्या सुनावणीत सर्व आमदारांना हजर राहण्याची आवश्यकता नाही. आमदारांची बाजू त्या त्या गटाच्या वकिलांकडून सुनावणीमध्ये मांडली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रता प्रकरणांमध्ये मागील चार महिन्यांमध्ये नेमक काय केलं? याचा लेखाजोखा मांडायचा आहे. मागील आठवड्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्ली दौरा करत काही कायदे तज्ज्ञांचा या सगळ्या प्रकरणात सल्ला घेतला होता. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेप्रकरणी पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी पुन्हा असल्याचं सागण्यात येत आहे. दरम्यान, या कम्प्युटर जनरेडेट तारखा असल्यामुळे यामध्ये बदल होण्याची देखील शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाचा कोणता युक्तीवाद?
आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले की, "हा खूप गंभीर विषय आहे. पाच अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत. 2022 मध्ये या प्रकरणी 12 जुलै 2022 पर्यंत उत्तर द्यायचं होतं. पण काहीच घडलं नाही. तुम्ही म्हणाला होता योग्य कालावधीत निर्णय द्यावा. निकालानंतर तीन वेळा त्यांना अर्ज केला 15, 23 मे आणि 2 जून त्यावर काहीच प्रतिसाद नाही. 18 सप्टेंबरला जेव्हा कोर्टाची तारीख आली त्याच्या आधी चार दिवस फक्त दिखावा म्हणून सुनावणी ठेवली. 2022 च्या प्रकरणात म्हणतात की आता आम्हाला कागदपत्रं मिळाले नाही. जुलै 2022 मध्ये उत्तर द्यायचं होतं. यांनी सप्टेंबर 2023 मध्ये दिलं आणि आता कागदपत्रांचे कारण पुढे करत आहे. अध्यक्ष म्हणतात सेपरेट ट्रायल करायचे आहे.