नेकनूर - कधी नव्हे ते यावर्षी ऑगस्ट महिना पावसाविना गेल्याने खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली आहेत. त्यातच विमा कंपनीने २५% अग्रीम रक्कम देण्यास नकार दिल्याने आम्ही पिके काय पेट्रोल टाकून जाळली काय? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांना विम्याचे २५% अग्रीम रक्कम तात्काळ मिळावी यासाठी नेकनूरमध्ये सर्वपक्षीय रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले होते.
यावर्षी सुरुवातीपासूनच नेकनूर परिसरात अगदी अत्यल्प पाऊस असून थोड्याफार प्रमाणावर झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या पेरण्या केल्या होत्या. जुलैपर्यंत थोड्याफार पावसावर पिके तग धरुन होती. पण ऑगस्ट हा संपूर्ण महिना पावसाविना गेल्याने परिस्थिती गंभीर झाली. सोयाबीन, उडीद, कापूस, बाजरी यासारखी पिके करपून गेली. जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर झाला. गंभीर दुष्काळाची दखल घेत प्रशासनातर्फे जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला २५% टक्के आग्रीम रक्कम देण्याचे आदेश दिले. पण कंपनीने प्रशासनाच्या आदेशाला न मानता अनेक मंडळे वगळल्याचे दिसून आल्यानंतर रास्ता रोको करण्यात आला. याप्रसंगी अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनी विषयी तीव्र भावना बोलून दाखवल्या शेतातील पिके जर पावसा अभावी नाही जळाली तर आम्ही काय पेट्रोल टाकून जाळली काय? असा सवाल शेतकरी उपस्थित करत होते. कंपनी यावर्षी शंभर टक्के पिक विमा दयावा अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली. पंधरा मिनिटांच्या या रास्ता रोको आंदोलनानंतर मंडळ अधिकारी पाळवदे, तलाठी हंगे व पोलीस उपनिरीक्षक गुट्टेवार यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. जि. प. सदस्य भारत काळे, दादाराव काळे, भास्कर शिंदे, सुधाकर कल्याणकर, रवींद्र काळे, फुलचंद काळे, राकेश शिंदे , भीमराव पायाळ, सौदागर सावंत, कल्याणराव शिंदे, अशोक शिंदे, रामनाथ घोडके, दादाराव जाधव, चक्रधर शिंदे, चक्रधर रावसाहेब शिंदे, मुकुंद काळे, गणेश शिंदे, पांडुरंग कानडे, जगन्नाथ नन्नवरे, बाळासाहेब कानडे, सुभाष शिंदे, प्रकाश खाकरे, राजाभाऊ निर्मळ, अनिल निर्मळ, विश्वनाथ सातपुते, अमित देशमुख, मयूर काळे, संदिपान मस्के, कांता जाधव, मेघराज काळे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .