Advertisement

संगणक टंकलेखन परीक्षेतही आता सीसीटीव्ही

प्रजापत्र | Tuesday, 30/12/2025
बातमी शेअर करा

मुंबई : दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा, 'टीईटी'च्या धर्तीवर आता संगणक टंकलेखन परीक्षा केंद्रांवरही सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. ज्या केंद्रांवर सीसीटीव्ही नाहीत, तेथील पर्यवेक्षकांचे झूम अॅपद्वारे मोबाईल कॅमेरे सुरू ठेवले जाणार आहेत. ५ ते १० जानेवारीपर्यंत २०३ केंद्रांवर इंग्रजी संगणक टंकलेखन परीक्षा पार पडणार आहे.

    संगणकावरील टंकलेखन झालेल्यांना शासकीय सेवेत किंवा खासगी नोकरीसाठी खूप मोठी मागणी आहे. लिपिक पदभरतीसाठी टंकलेखन आवश्यक आहे. स्टेनो झालेल्यांना न्यायालयासह अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत.परीक्षेत उतारा, ई-मेल, लेटर (पत्र), वस्तुनिष्ठ प्रश्न व स्टेटमेंट, दीड तासांत विद्यार्थ्यांना संगणकावर टंकलिखित करावे लागते. पूर्वी टाईपरायटर मशिनवर ही परीक्षा होत होती, पण आता संगणकावर घेतली जाते.उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नोंद ऑनलाइन होते, त्यामुळे बनावट प्रमाणपत्रे देण्याचे प्रकार बंद झाले. संगणक टंकलेखन झालेलेच विद्यार्थी पुढे शासकीय सेवेत दाखल होतात. या पार्श्वभूमीवर संगणक टंकलेखन परीक्षा पारदर्शक व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक पाऊल पुढे टाकले आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, पर्यवेक्षकांच्या मोबाईलचे कॅमेरे सुरू ठेवण्यात येणार आहेत. पहिल्यांदाच हा बदल यंदा केला जाणार आहे.

 

संगणक टंकलेखन परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी काही केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. उर्वरित सर्व केंद्रांवरील पर्यवेक्षकांचे 'झूम'द्वारे मोबाईल कॅमेरे सुरू ठेवले जातील. परीक्षा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत केंद्रावरील सर्व हालचाली त्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपल्या जातील, असे नियोजन आहे.

- डॉ. नंदकुमार बेडसे, आयुक्त. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
 

Advertisement

Advertisement