Advertisement

आंदोलनाला गालबोट लागेल असे कृत्य करू नका

प्रजापत्र | Friday, 08/09/2023
बातमी शेअर करा

जालना - मराठा आंदोलनाला गालबोट लागेल, असे कृत्य कुणीही करू नये. आम्ही मराठा समाजातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमचे जीवन पणाला लावले आहे. त्यामुळे कुणीही आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये, असे आवाहन मनोज जरांगे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे. आत्महत्या, जाळपोळ, दगडफेक असे कृत्य कोणीही न करण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.

राज्यातील मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यात अनेक कार्यकर्त्यांनी गाड्या जाळल्या आहेत. तर काही तरुणांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या या आंदोलनाला गालबोट लागण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यातील सर्व मराठा बांधवांना कळकळीचे आवाहन केले आहे.

 

काय म्हणाले मनोज जरांगे

या आंदोलनाला सर्व मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. वाढता पाठिंबा पाहता, आपल्याला यश येण्याची शक्यता जास्त आहे. मराठा समाजाने आंदोलने करावे, पाठिंबा वाढवावा मात्र, आंदोलनाला गालबोट लागेल, असे काहीही करू नये, असे आवाहन आंतरवाली सराटी येथून आपण करत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तरुणांनी आत्महत्या केली तर आम्ही आरक्षण कोणासाठी मागतोय? मिळालेल्या आरक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांनी उचचला पाहिजे, हाच आमचा अट्टहास असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, कोणीही उग्र आंदोलन करू नये, असे आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement