Advertisement

बीड बसस्थानकासमोर भल्या पहाटे दारू विकणारा गजाआड

प्रजापत्र | Thursday, 07/09/2023
बातमी शेअर करा

बीड-येथील बसस्थानकासमोर भल्या पहाटे चहाच्या गाड्यावरून दारूची अवैध दारू विक्री करणाऱ्यास पोलीस अधिक्षक यांच्या पथकाचे प्रमुख गणेश मुंडे यांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी संबंधित व्यक्तीकडून १०५ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई आज पहाटे ५ च्या सुमारास करण्यात आली.शिवाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्याविरोधात मुंडे यांची आठ दिवसातील ही दुसरी कारवाई ठरली आहे.

    बीड शहरातील सर्वात वर्दळीचे ठिकाण असलेल्या बस स्थानकासमोर एका चहाच्या गाड्यावरून देशी दारूची अवैध विक्री सुरु होती. याबाबत पोलीस अधिक्षक यांच्या पथकाचे प्रमुख गणेश मुंडे यांना याची माहिती मिळाल्यानंतर भल्या पहाटे ५ वाजता त्यांनी चहा विक्री करणाऱ्या गाड्यावरून किरण धाडीवले (रा.नेहरू नगर बीड) यास ताब्यात घेतले. यावेळी झाडाझाडती घेतली असता ४ हजारांच्या १०५ दारूच्या बाटल्या आढळून आल्या. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक पथक प्रमुख सपोनि गणेश मुंडे विष्णू वायबसे, स्वाती मुंडे यांनी केली. याप्रकारणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे आठ दिवसापूर्वी शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या मटक्याविरोधात कारवाई करत मुंडे यांनी दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आजची कारवाई झाल्याने शिवाजी नगर ठाण्याचे प्रमुख असलेले अधिकारी अवैध धंद्याना पाठबळ देतात की काय?असा प्रश्न निर्माण होतं आहे.

Advertisement

Advertisement