Advertisement

मी स्वप्नातही तसा विचार करू शकत नाही

प्रजापत्र | Saturday, 19/08/2023
बातमी शेअर करा

बीड - राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गट आक्रमक झाला आहे. शरद पवार यांनी राज्याचा दौरा करण्याची घोषणा केली आहे. दोन दिवसापूर्वी शरद पवारांची स्वाभिमान सभा बीडमध्ये झाली. यावेळी त्यांनी अजित पवार गटात गेलेले अमरसिंह पंडित यांच्यावर खा. शरद पवार यांनी टीका केली. बीड येथील स्वाभिमानी सभेत शरद पवार यांनी माझे वय काढता; पण तुम्ही माझे काय बघितले, अशी टीकाही पंडित यांच्यावर केली होती.यावर आता अमरसिंह पंडितांनी भावनिक पोस्ट केली आहे.

 

अमरसिंह पंडितांची पोस्ट जशीच्या तशी

श्रध्देय साहेब, काल, आज आणि भविष्यातही तुमच्याबद्दल श्रध्दा आणि आदर कायम राहील. कालच्या सभेत आपण माझ्या तोंडी घातलेल्या वाक्याबाबत मी स्वप्नातही तसा विचार करू शकत नाही. आपल्या कानी कोणी काय घातले हे मला माहित नाही, त्याविषयी जाणून घेण्यात स्वारस्यही नाही मात्र हे अत्यंत क्लेषदायक आहे, एवढेच सांगतो, असे म्हणत पंडित यांनी पवारांसोबतचा पाच वर्षांपूर्वीचा परदेशातील शेती अभ्यास दौऱ्यातील फोटोही जोडला आहे. आम्हा भावंडांवर श्री.शिवाजीराव पंडित यांचे संस्कार आहेत, त्यामुळे केवळ तुमचे वय झाले म्हणून नेतृत्व बदल केला असे तोडके विचार आमच्या मनी येणार नाहीत. याबद्दल सार्वजनिक ठिकाणी सोडा परंतु वैयक्तिक सुध्दा कोणाला बोललेलो नाही. तुम्हाला शंभर वर्षे निरामय आयुष्य लाभो हीच सदैव भवानी चरणी प्रार्थना आहे. तुमच्या सोबत अनेक वर्षे निष्ठेने काम करताना अनेक संधी आणि प्रलोभने मिळाली मात्र त्यावेळी कधीही डगमगलो नाही, तुमची साथ सोडली नाही. राजकारणाच्या पलिकडे जावून पवार परिवाराशी शिवछत्र परिवाराचा स्नेहबंध, तो भविष्यातही जपणार आहे. तुम्ही आणि अजितदादा वेगळे व्हावेत हेच मुळात पटत नाही... असो, राजकीय निर्णय घेताना वैयक्तिक लाभाचा विचार कधीच मनाला शिवला नाही, लाभापायी काही निर्णय घेणार नाही याची खात्री तर तुम्हालाही असेल. बाकी माणुसकी वगैरे जपणारच कारण तुमचेच राजकीय संस्कार आहेत, असे गेवराईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी मत व्यक्त केले आहे.

Advertisement

Advertisement