अमरावती - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भिडेंवर जोरदार टीका होऊ लागली आहे. दुसरीकडे अमरावती येथील पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला. तर पावसाळी अधिवेशनात देखील त्यांच्या विधानाचे पडसाद मिळाले. परंतू संभाजी भिडेंची वादग्रस्त विधान करण्याची मालिका काही केल्या थांबत नसल्याचे दिसून येत आहे.अमरावती येथे आयोजित व्याख्यानप्रसंगी संभाजी भिडे यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, साईबाबा, राजा राममोहन रॉय यांच्यावर खालच्या पातळीत जाऊन विधानं केली आहेत.
महात्मा फुले, साईबाबांवर शिव्यांची लाखोली
संभाजी भिडे यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले, राजाराममोहन रॉय व साईबाबांवर वादग्रस्त विधान केले. हे बोलत असतांना त्यांनी मध्ये मध्ये शिव्यांची लाखोली वाहिली. त्यांच्या तीन तासांच्या भाषणात शेकडो शिव्या आणि जातीय तेढ निर्माण करणारी विधाने होती. महात्मा ज्योतिराव फुले सारख्या समाजसुधारकास आणि लाखोंची श्रद्धा असलेल्या साईबाबांबद्दल अवमानजनक शब्द वापरल्यामुळे जनतेततून संताप व्यक्त केला जात आहे.
फुलेही त्या XXXयादीतले
संभाजी भिडे यानी महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, महिला शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते व ज्यांना मोठ्या सन्मानाने क्रांतिसूर्य संबोधल्या जाते.त्या महात्मा फुलेंबद्दल अश्लाघ्य भाषेत तोंडसुख घेतले. देशात इंग्रजांनी ज्या ''---- समाजसुधारकांच्या पदव्या बहाल केल्या, फुलेही त्या समाजसुधारक नावाच्या भXXXX यादीतले असल्याचे वक्तव्य संभाजी भिडे यांनी अमरावती येथील व्याख्यानात केले.
महात्मा फुले यांच्याबाबत बोलतांना भिडे म्हणाले की, इंग्रजांनी भारतीयांना राज्य कसे मिळवायचे हे शिकण्यासाठी देशात सुधारक नावाची जात पैदा केली. निवडक लोकांना सुपर समाजसुधारकांच्या पदव्या देऊन तुमचेच वैरी तुमच्यावर सोडले. त्यात उत्तर प्रदेशामध्ये भारतप्रसाद मिश्रा, बंगालमध्ये राजा राममोहन रॉय, तामिळनाडूमध्ये रामास्वामी नायकर व महाराष्ट्रात महात्मा फुले यांचा प्रामुख्याने समावेश होता. या सगळ्यांच्या ढुंXXXX देशद्रोहाचे शिक्के असून माझ्याकडे त्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहे. यावर मी दोन तास भाषण देऊन मोठे खुलासे करू शकतो, असे वादग्रस्त विधान भिडेंनी केले.
हिंदूंनो, साईबाबाला देव्हाऱ्यातून काढून टाका
आपला हिंदू समाज साईबाबाला पुजतो, त्या साईबाबांची लायकी काय ते तपासा, सर्वप्रथम त्या साईबाबाला आपल्या घर-घरातील देव्हा-यातून बाहेर काढून फेका लक्षात ठेवा मी काय बोलतोय, मी काही डोके सटकलेला माणूस नाही, मी सर्व जबाबदारीने बोलतोय हे लक्षात घेऊन त्याला हिंदूंचा देव मानू नका असे जाहीर आवाहन भिडेंनी करत साईबाबांवर वादग्रस्त विधान केले.