विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाआधी राष्ट्रवादीत फूट पडली आहे. अजित पवार (AJIT PAWAR) काही आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाले आहेत. यावरून राज्यातील राजकारण तापलेलं असताना राजकारणात आता पुन्हा एक ट्वीस्ट आलं आहे. अजित पवारांसह गेलेल्या आमदारांनी वाय.बी.सेंटरवर शरद पवारांची भेट घेतली आहे. उद्यापासून (१७ जुलै) राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधीच बंडखोर आमदारांनी शरद पवारांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवारांनी एकमेकांविषयी कठोर भूमिका जाहीर केली होती. शरद पवारांवर टीका करताना अजित पवारांनी त्यांचं वयही बाहेर काढल, तर शरद पवारांनी त्यांचा फोटो वापरण्यासही मज्जाव केला. या दोन्ही मोठ्या नेत्यांचं नाराजीनाट्य टोकाला पोहोचलेलं असताना आता अजित पवारांनी त्यांच्या इतर बंडखोर आमदारांसह शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय नाट्य रंगण्याची शक्यता आहे.
यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (JAYANT PATIL) म्हणाले की, “पवारांच्या भेटीला कोण आले आहे मला माहिती नाही. मला सुप्रिया सुळेंचा फोन आला, म्हणून मी वाय.बी.सेंटरला तातडीने दाखल झालो आहे. मला फक्त येथे भेटायला बोलावले आहे.”