Advertisement

युवकास मारहाण करून अपहरण करण्याचा डाव फसला

प्रजापत्र | Saturday, 15/07/2023
बातमी शेअर करा

 

माजलगाव - शहरातील शाहु नगर परिसरात राहणाऱ्या युवकाचे पैशाच्या झालेल्या वादातुन अपहरण करून जिवे मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या अपहरणकर्त्यांना शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या सतर्कतेमुळे गढी टोलनाक्यावर पकडले असुन गणेश भिसे रा.परळी याच्यासह चौघांविरुद्ध शहर पोलिसात परमेश्वर वैजनाथ लेवडे यांच्या फिर्यादीवरून शनिवारी (दि.१५) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

परमेश्वर वैजनाथ लेवडे (वय-२५) या युवकाचे शहरामध्ये फुटवेअरचे दुकान आहे. मागील एक वर्षापूर्वी वैजनाथ लेवडे यांनी रमेश बालासाहेब वारे रा. कोथरूळ (एजंट) यांच्याकडे विस लाख रूपये गणेश राजाराम भिसे रा.अंबाजोगाई याचे जीआरबी कंपनीमध्ये गुंतवणुक करणेसाठी दिले होते. सदर रक्कमेचा परतावा दोन लाख दहा हजार परत देण्यात आला व त्यानंतर सदरची बाकी रक्कम व त्याचा वाढिव परतावा दिलेला नाही. त्याच्या बदल्यात गणेश भिसे याने त्याच्या एचडीएफसी बँकेचा चेक वडीलांना दिला होता. सदर चेक बँकेत वटविण्यासाठी दिला असता भिसे याच्या खात्यामध्ये पैसे नसल्याने तो वटला नाही म्हणुन त्या चेकच्या अधारे मागील चार महिण्यांपूर्वी येथील कोर्टात गणेश भिसे, रमेश वारे, पुजा भिसे व प्रिती भिसे यांचे विरूध्द केस दाखल केली आहे. (दि.१४) रोजी गणेश राजाराम भिसे याचा फोन आला व पैशाबद्दल बोलू बायपास रोडला ये म्हणत होता मी त्यास माझ्या दुकानात ये म्हणालो परंतु त्याने मला तुच इकडे ये म्हणुन बोलावले. यावर मी व माझा मित्र सुनिल बब्रुवान फपाळ रा. बेलुरा आम्ही गेलो असता मला त्यांच्याकडे असलेल्या विना नंबरच्या सफारी गाडीमध्ये बसवुन पुढे चहा घेउ म्हणत युवकास मारहाण करत गढी रोडने वेगाने गाडी पळविली गाडीतील दोघांनी मला लाथा बुक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावर गणेश भिसे याने तुला आता जिवे मारून टाकण्यासाठी घेउन जात आहोत असे म्हणाला तसेच तुझ्या भावाचे पण हातपाय आम्ही तोडणार आहोत असे बोलत होता. मला गणेश भिसे व त्याचे सोबतच्या तीन जणांनी बळजबरीने गाडीत बसवून घेवून गेल्याने माझा मित्र सुनिल फपाळ याने डायल ११२ वर पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावर पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी सतर्कता दाखवत गेवराई पोलिसांना व ट्रैफिक पोलिसांना गाडीचे वर्णन सांगीतले व गढीजवळ असलेल्या टोलनाक्यावर ट्रैफिक पोलिसांनी गाडी थांबवत माझी सुटका केली. सदरील सफारी गाडी गेवराई पोलिस स्टेशनला घेवुन गेले. याठिकाणी माजलगाव पोलिस आले व सर्वांना माजलगाव येथे घेउन आले. याप्रकरणी परमेश्वर वैजनाथ लेवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश राजाराम भिसे रा. अंबाजोगाई, हनुमंत त्रिंबक झोडगे रा, भिमनगर परळी वै. श्रीनिवास अशोक चव्हाण रा. जवळगाव ता. अंबाजोगाई, रविंद्र राजेभा आव्हाड रा. बडसावित्रीनगर परळी वै. यांचेविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश इधाते हे करत आहेत.

Advertisement

Advertisement