मुंबई: राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑटो रिक्षा, ओमनी,खाजगी वाहनातून कोंबून शाळेत नेले जाते. अनेक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना भरले जाते. यातून विद्यार्थ्यांचा कोंडमारा होतो. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी कठोर कायदे असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची कबुली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली. यावेळी सर्वपक्षीय सदस्यांनी परिवहन आणि शिक्षण विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले.
अखेर खाजगी वाहनातून होणारी विद्यार्थ्यांची बेकायदेशीर वाहतूक करण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी स्वतंत्र परवाने देण्यात यावेत, असे परवाने नसणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करून ती जप्त करण्यात यावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत दिले. याबाबतचा प्रश्न रईस शेख यांनी उपस्थित केला होता त्यावर संजय मेश्राम , अभिमन्यू पवार आदींनी उपप्रश्न विचारले, परिवहन विभागाशी संपर्क साधून अशा सर्व वाहनांची योग्य निगा राखण्याची, तपासणी करणे, दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आदी बाबी केल्या जातील असं उत्तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आधी दिलं होतं त्यावर अध्यक्षांनी हस्तक्षेप करत हे निर्देश दिले.

