Advertisement

परळीत जनसागरासमोर धनंजय मुंडे भावूक

प्रजापत्र | Thursday, 13/07/2023
बातमी शेअर करा

 

परळी - परळीतल्या या पोरावर इथल्या जनतेनं अभुतपूर्व प्रेम केलं, इथल्याच नाही जिल्ह्यातल्या जनतेनं प्रेम केलं. सकाळी 7 ला बाहेर पडलो होतो, परळीत पोहोचायला 9 वाजले. इतकं सारं प्रेम जनतेनं केलं आहे. इथल्या प्रत्येक कुटुंबाशी माझं नातं आहे. हे नातं मुलाचं आई बापाशी असतं तसं नातं आहे. जो विश्‍वास आणि जे प्रेम या जनतेनं माझ्यावर केलं आहे, त्याची परतफेड मी असंख्य जन्मातही करू शकणार नाही असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे भावूकपणे परळीच्या जनतेसमोर नतमस्तक झाले.

मंत्री म्हणून पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात आलेल्या धनंजय मुंडे यांचा परळीत भव्य नागरी सत्कार झाला. हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत वेळेची कमतरता असतांनाही धनंजय मुंडेंनी आपल्या भावनांना वाट करून दिली. मी परळीकरांना शब्द दिला होता की राजकीय पटलावर ज्यावेळी काही उलथा पालथी घडतील त्यावेळी परळीच्या वैद्यनाथाला विचारल्याशिवाय काही होणार नाही, आज ते सिद्ध झाले आहे. काही महिन्यापूर्वी याच मातीत मी म्हटलं होतं ‘जरा सा वक्तने साथ क्या ना दिया, लोग मेरी काबिलियत पे शक करणे लगे’ आज आपण काबिल आहोत हे मी देशाला दाखवून दिलं आहे. माय बाप जनतेची सेवा करायची हीच आपली भावना आहे. सत्ता येत असते, जात असते पण वाईट काळात ज्यांनी मदत केली त्यांचे उपकार विसरायचे नसतात. 2010 ला विधान सभेला मी लायक असतांनाही मला विधान परिषद लढवावी लागली. त्यावेळी सभागृहात जायला दोन मतं कमी होती, ती दोन मतं मला अजीत पवारांनी दिली हे कसं विसरायचं असेही धनंजय मुंडे म्हणाले.

आता मंत्री झालोय, लोकांच्या अपेक्षा वाढल्यात, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पुर्ण करणं अवघड नसतं पण वेळ लागेल, नाराज होवू नका, विधानसभेच्या प्रचाराच्या वेळी जी जी वचनं दिली होती ती वचनं मी वर्षभरात पुर्ण करील. आज खुप काही बोलायचं होतं पण वेळ नाहीयं, त्यामुळं जास्त बोलता येत नाही, मात्र याच जागेवर राज्याच्या अख्ख्या मंत्रीमंडळाला तुमच्या समोर आणेल. आपल्याला दादांचं, एकनाथ शिंदेचं, फडणवीसांचं ऋण व्यक्त करायचं आहे. शेवटी इतकंच सांगतो विश्‍वास ठेवा जिथं जाल तिथं मान उंच करून सांगाल, तुम्ही परळीच्या भुमितले आहात आणि तुमचा लोकप्रतिनिधी धनंजय मुंडे आहे असं काम करेल असे म्हणत धनंजय मुंडे भावूक झाले. 

 

Advertisement

Advertisement