बुलढाणा - समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) अपघातांचे सत्र अद्याप सुरूच आहे. महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वात भयंकर अपघात सिंदखेडराजानजीक घडला आहे. ट्रॅव्हल्सपलटी होऊन जागीच पेट घेतला. या अपघातात बसमध्ये झोपलेल्या 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. (Buldhana Samruddhi Mahamarg Accident)
या अपघातात ट्रॅव्हल्स बस दुभाजकाला धडकली त्यानंतर पलटी होऊन ट्रॅव्हलने पेट घेतला. अपघातात बसमध्ये झोपलेल्या प्रवाशांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. तब्बल एक ते दीड तास चाललेल्या या अग्नीतांडवात 25 जणांनी जीव गमावला आहे. रात्रीची वेळ असल्याने त्यांना वाचवायला त्यांच्यापर्यंत कोणीही पोहोचू शकले नाही. ट्रॅव्हलच्या केबिनमध्ये बसलेले काही जण आणि काही प्रवासी यात बचावले असल्याची शक्यता आहे.
मध्यरात्री 2च्या सुमारास हा अपघात घडला असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याला जाणारी होती. बुलढाण्यातील सिंदखेडराजानजीक पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावर हा अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण आहे की बस संपूर्ण जळून खाक झाली आहे.