Advertisement

मराठवाड्यात 'या' दिवसापासून पाऊस होणार सक्रिय

प्रजापत्र | Saturday, 24/06/2023
बातमी शेअर करा

 

नवी दिल्ली - पुढील 4 दिवस देशातील 20 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, ओडिशा, उत्तराखंड, तेलंगणा, नागालँड, मणिपूर, मिझोराम, हिमाचल प्रदेश, कोकण आणि गोवा, विदर्भ, किनारी आंध्र प्रदेश, किनारी कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे.

 

महाराष्ट्राचा हवामान अंदाज

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी मान्सूनचा प्रवेश झाला. येत्या तीन दिवसांत संपूर्ण विदर्भासह राज्याच्या बहुतांश भागात मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्राचे संचालक एम. एल. साहू यांनी दिली. तर मध्य महाराष्ट्रातील 10 तर संपूर्ण मराठवाड्यात शनिवारी मध्यम तर रविवारपासून जोरदार मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्गात आठवडाभर जोरदार तर विदर्भातील 10 जिल्ह्यांत शनिवारी, रविवारी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

 

मराठवाड्यात रविवारपासून जोरदार : नागपुरात गुरुवारी रात्री 10 ते शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 37.4 मिमी पाऊस झाला. अमरावती 25.8, गोंदिया 38.8, चंद्रपूर 18.8 मिमी नोंद झाली. नाशिक, नगर, पुणे, सातारा पूर्व भागात तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस पावसाचे प्रमाण कमी असले तरी रविवारपासून या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

 

 

 

7 दिवसांच्या विलंबानंतर देशात दाखल झालेला मान्सून आज ना उद्या मध्य प्रदेशात पोहोचणार आहे. 29 जूनपर्यंत मान्सून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचेल. हवामान खात्यानुसार आज मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी मुंबईत पाऊस झाला. मान्सूनने शुक्रवारी छत्तीसगडमध्ये प्रवेश केला.

 

त्याचवेळी आसाममध्ये पुरामुळे परिस्थिती अजूनही बिकट आहे. येथे 20 जिल्ह्यांतील 5 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. पावसात 2 जणांना आपला जीव गमवावा लागल्याचीही बातमी आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून उशिराने देशात दाखल झाला. मात्र, आता बिपरजॉयचा प्रभाव संपल्याने सर्वच राज्यांमध्ये मान्सून वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement