साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद जगजाहीर आहे. दोघांकडून सातत्याने एकमेकांना लक्ष्य केलं जातं. अनेकदा हे वाद गंभीर रुप धारण करतात. बुधवारी सकाळीच या दोघांमधल्या वादाचं असंच एक रुप साताऱ्याच्या खिंदवाडी गावात पाहायला मिळालं. एका जमिनीच्या तुकड्यावरून हे दोघे आमने-सामने आले. त्यानंतर दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला. अखेर पोलिसांना मध्यस्थी करून हा वाद मिटवावा लागला. पण नेमका वाद काय होता? याबाबत दोघांनीही माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली आहे.
नेमकं घडलं काय?
साताऱ्यातल्या खिंदवाडी भागात आज सकाळी उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचे समर्थक एकमेकांना भिडले. निमित्त होतं एका कंटेनरचं! कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराच्या उभारणीची तयारी आज शिवेंद्रराजेंकडून करण्यात आली. त्यासाठी रीतसर भूमीपूजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्यासाठी या जागेवर एक कंटेनर तात्पुरतं कार्यालय म्हणून उभा करण्यात आला होता. पण काही वेळातच सकाळी ९ च्या सुमारास उदयनराजेंचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी कंटेनर जेसीबीच्या मदतीने उलटा केला.
यानंतर या दोघांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूंनी आक्रमकपणे भूमिका मांडण्यात आली. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून जमावाला पांगवलं. या सर्व प्रकारावर उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंनी माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली आहे.
जागा कुणाच्या मालकीची?
सदर जागा आपल्याच मालकीची असल्याचा दावा उदयनराजे भोसलेंनी केला आहे. “ती जागा माझ्या मालकीची आहे. तिथे हे सगळे अल्पभूधारक लोक कोण आहेत? ते जवळपास सात-आठ वर्षं आर्मीमध्ये होते. आज तुम्ही तिथे येऊन दगड ठेवणार, नारळ फोडणार, फटाके फोडणार? या प्रकरणात न्यायालयाचे स्थगिती आदेश आहेत. पण पोलीस त्यांना मदत करत आहेत. त्यामुळे यावरचा सविस्तर ड्राफ्ट तयार करू. उद्या उपमुख्यमंत्री इथे येणार आहेत. त्यांच्यासमोर ही मांडणी करणार आहोत”, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली.