बरोबर एक वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. 20 जूनला विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकासआघाडी सरकार कोसळलं. पुढे भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदार संजय शिरसाट यांनी बरोबर एक वर्षानंतर मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे.
शरद पवारांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील भावूक झाले होते.. मात्र जयंत पाटील तेव्हा नाटक करत होते, असं विधान संजय शिरसाटांनी केलंय, तसंच राष्ट्रवादीचा जन्मच मुळात गद्दारीतून झालाय, अशी बोचरी टीकादेखील शिरसाटांनी केली आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट?
'जयंत पाटील आमच्या संपर्कात नाहीत ते भाजपमध्ये जातील, निश्चित जातील, म्हणून आजकाल त्यांची स्टेटमेंट त्या पद्धतीने चालली आहेत. शिवसेनेची लोक कमळ या चिन्हावर निवडणूक लढतील, असं ते म्हणतात, तुम्हाला कुणी सांगितलं? तुम्ही ज्योतिषी आहात का? कमळाबद्दल तुम्हाला का आपुलकी वाटते?', असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.
'जयंत पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये कुणामुळे त्रास होतोय, हे त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना विचारलं तर त्याचं खरं उत्तर तो देईल. राजकारणामध्ये आम्ही सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. आमच्यामध्ये काही कुरबुरी असतील तर ते पाहत असतात, त्यांच्या पक्षात काय आहे, ते हे पाहत असतात. मी हवेत बोलत नाही, मी काही संजय राऊत नाही', असंही संजय शिरसाट यांनी सांगितलं.
विधानसभेमध्ये जयंत पाटील यांच्याबद्दल बोलताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते ते पाहा, असं सूचक वक्तव्यही संजय शिरसाट यांनी केलं आहे.