अंबाजोगाई: अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी येथील मूळ रहिवासी आणि सध्या पुण्यात स्थायिक असलेल्या एका सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याची कोट्यवधी रुपयांची जमीन हडपण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत रंगनाथ मोरे (रा. मोरेवाडी, सध्या सुसरोड, पाषाण, पुणे) यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मोरे हे नाबार्ड बँकेतून २०१६ मध्ये सेवानिवृत्त झाले असून त्यांची मोरेवाडी शिवारात गट क्रमांक ४४ आणि ८५ मध्ये वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीचे व्यवहार त्यांनी कधीही कोणाशी केले नव्हते. मात्र, आरोपी कर्णमुर्ती गंगाधर साळवे (रा. मोरेवाडी) आणि वैभव बाबाराव तरकसे (रा. धावडी) यांनी संगनमत करून मोरे यांच्या नावाचा बनावट मुद्रांक खरेदी केला. या मुद्रांकावर जमिनीची विक्री केल्याचे बनावट ईसारपावती व साठेखत तयार करण्यात आले.आरोपींनी या बनावट कागदपत्रांच्या आधारे फिर्यादीकडून १० लाख रुपये रोख देऊन जमीन विक्रीचा व्यवहार निश्चित केल्याचा खोटा बनाव रचला. इतकेच नव्हे तर या बनावट कागदपत्रांचा वापर करून त्यांनी अंबाजोगाई येथील दिवाणी न्यायालयात जमिनीच्या मालकी हक्काबाबत दावा देखील दाखल केला. हा सर्व प्रकार फिर्यादीला त्यांच्या नातेवाईकांकडून कळाला. वकील व न्यायालयामार्फत कागदपत्रांची पडताळणी केली असता आपल्या सहीचा आणि नावाचा गैरवापर करून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोरे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.अंबाजोगाई शहर पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

