अजित पवारांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काय होणार आणि राष्ट्रवादीची सूत्रे कोण सांभाळणार या प्रश्नांची उत्तरे आता राज्याला मिळाली आहेत. केवळ अजित पवारांचे उपमुख्यमंत्रीपदच नाही, तर त्यांच्याकडे असलेले राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षपद देखील सुनेत्रा पवारांकडे देण्यात आले असून आता राष्ट्रवादीत 'सुनेत्रा पर्व ' सुरु झाल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षावर इतर कोणाला नियंत्रण मिळविता येणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. राजकारणातील पक्षावरील नियंत्रण निश्चित करून सुनेत्रा पर्वाची सुरुवात करण्यात आज राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आले असले आणि आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण होण्याच्या शक्यता तूर्तास तरी संपलेल्या असलेल्या तरी 'सुनेत्रा पर्व ' चा प्रवास हा अनेक आव्हानांचा असणार आहे.
राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या विलीनीकरणाचे , कथित रित्या दिवंगत अजित पवारांनी सुरु केलेले प्रयत्न हा आता इतिहास होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे दोन्ही आता आपापल्या पातळ्यांवर वेगळे अस्तित्व टिकवून राहणार हे स्पष्ट झाले आहे. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादीसमोर आणि साहजिकच, त्यांच्या पक्षाच्या सर्वच नेत्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले होतेच. शरद पवारांच्या विरोधात जाऊन अजित पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय ज्या नेत्यांनी घेतला होता, त्यांना अजित पवार असेपर्यंत काही अडचण नव्हतीच, मात्र अजित पवारानंतर जर खरोखर विलीनीकरण झाले असतेच, तर पक्षाची सूत्रे शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याकडे गेली असती, तर या सर्वच नेत्यांचे राजकीय करिअर जुगारावर लागले असते हे निश्चित. मुळात एका पक्षात अनेक सत्ताकेंद्रे निर्माण होणे कोणत्याच पक्षाच्या हिताचे देखील नसते , त्यामुळेही राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांच्या अकाली जाण्यानंतर स्वतःचा चेहरा शोधणे आवश्यक होतेच, आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तो सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून शोधला. अगोदर कोणत्याही टीकेची पर्वा न करता सुनेत्रा पवारांनी घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची स्वीकारलेली सूत्रे या माध्यमातून सुनेत्रा पवारांनी त्यांच्यातील कणखर राजकारणी दाखवून दिला आहेच. त्यामुळेच आता राष्ट्रवादीने 'सुनेत्रा पर्व ' ची केलेली घोषणा या पक्षाला शरद पवारांच्या गटापेक्षा वेगळी वाट ठामपणे चालायची आहे हे स्पष्ट करणारे आहे.
सुनेत्रा पर्वाची सुरुवात करण्यात राष्ट्रवादीने निश्चितच ठामपणा दाखविला आहे, मात्र हा प्रवास आज जरी सोपा वाटत असला तरी त्या प्रवासातली आव्हाने देखील तितकीच मोठी असणार आहेत. मुळात अजित पवारांच्या राजकारणाचा बाज वेगळा होता, राज्यव्यापी चेहरा आणि प्रचंड संघटन कौशल्य तसेच संघटनात्मक दबदबा हे त्यांचे गुण होते, आता या आघाड्यांवर सुनेत्रा पवारांना स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. मागच्या काही काळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत देखील अस्वस्थता होतीच , आता त्या अस्वस्थतेला शांत करणे आणि सर्व जेष्ठांना सोबत घेतानाच पक्षाचा रिमोट स्वतःकडेच आहे हे दाखविणे याची कसरत सुनेत्रा पवार कशी करतील त्यावर खूप काही अवलंबून असेल. मुळातच अजित पवार हा जसा निवडणूक जिंकून देणारा चेहरा होता, किंबहुना त्यामुळेच शरद पवारांचा विरोध पत्करून अनेकांनी अजित पवारांना साथ दिली होती, त्या आघाडीवर आपण देखील निवडणुका जिंकून देऊ शकतो हा विश्वास निर्माण करून देण्यासाठी आता सुनेत्रा पवारांना मेहनत घ्यावी लागणार आहे.
या सर्वांपेक्षाही मोठे आव्हान असणार आहे ते २०२९ चे. बाज जरी राष्ट्रवादी महायुतीचा भाग असली, तरी २०२९ मध्ये महायुती असेलच असे सांगता येत नाही, जास्त शक्यता महायुती नसण्याचीच आहे. भाजपने यापूर्वीच २०२९ साठी 'शत प्रतिशत' चा नारा दिलेला असून कुबड्या बाजूला टाकण्याचे देखील स्पष्ट केलेले आहेच, मग अशावेळी राष्ट्रवादीला भाजपच्या विरोधात जावे लागले तर काय? याचे नियोजन आतापासून करण्याची तयारी आणि मानसिकता सुनेत्रा पर्वाला दाखवावी लागणार आहे. त्यावेळी विरोधीपक्ष म्हणून जावे लागले तर सत्तेला सरावलेले कोण सोबत असतील आणि आता शरद पवार गट दुरावला तर पुन्हा मग सोबत कोण असेल या मोठ्या आव्हानाचा विचार सुनेत्रा पवारांना करावा लागणार आहे.

बातमी शेअर करा
