Advertisement

राज्यातील धरणं भरलेली नाहीत यावर बोला - अजित पवार

प्रजापत्र | Monday, 19/06/2023
बातमी शेअर करा

 

अमरावती - राज्यात विविध प्रकारचे प्रश्न असताना सरकारमध्ये असलेल्या पक्षांचे नेते भालत्याच गोष्टींवर बोलत आहेत. शेतकऱ्यांना अनेक प्रश्नांना समोर जावं लागत आहे. पाऊस नसल्यानं धरणं भरलेली नाहीत, त्यावर बोला ना! अशा शब्दांत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं. अमरावती इथं पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

 

पवार म्हणाले, "बावनकुळेंनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे कारण एका सत्ताधारी पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. पण असा प्लॅन होता तसा प्लॅन होता याला काहीही अर्थ नाही. पहिल्यांदा राज्यातील महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या अनेक प्रकारच्या समस्यांवर बोला ना. हे असं होणार होतं तसं होणार होतं अशी चर्चा करुन महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का?" 

आज पावसानं ओढ दिली आहे, अमरावती परिसरात, कोकणात पाऊस नाही. धरणातील पाण्याचे साठे संपत चालले आहेत. शेतीला पाणी मिळू शकत नाही. प्यायला पाणी कसं द्यायचं असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

टँकरची मागणी वाढते आहेत, हे महत्वाचे प्रश्न आहेत. दुबार पेरणी काही शेतकऱ्यांना करावी लागते त्यांना बियाणं कसं मिळेल, खतांच्या वाढत्या किंमती, कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था, कापूसला भाव नाही, या समस्या आहेत यावर बोला ना. या प्रश्नाची उत्तर दिली तर समाजाला दिलासा मिळेल, अशा शब्दांत अजितदादांनी सुनावलं आहे.

मी या सर्वेला काही अर्थ नसतो. लक्ष विचलीत करण्यासाठी ते केले जातात. काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक वर्तमान पत्रात सर्व्हेवरुन जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीला शह देण्यासाठी म्हणून हा सर्व्हे आला असेल कारण त्या सर्व्हेत फडणवीसांना कमी दाखवण्यात आलं होतं. भाजपच्या पाठिंब्यावर हे सरकार आलं आहे, त्यामुळं भाजपनं त्यावर प्रतिक्रिया दिल्या. यापेक्षा महत्वाचे प्रश्न सोडण्याचं काम शिंदे-फडणवीस सरकारनं करावी, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

 

सरकारच्या कामगिरीवर कोणीही नाही समाधानी
उद्या आमची विधानसभा आणि विधानपरिषदेच्या राष्ट्रवादीच्या सहयोगी पक्षांची मिटिंग आहे. आम्ही त्या अँगलनं कधी विचार करत नाही. पण तुम्ही प्रश्न विचारत आहात तर सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. एकंदरीत मविआ एकत्रित रहावी यासाठी तिन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत.

Advertisement

Advertisement