सोयगाव - सिल्लोडच्या धर्तीवर सोयगाव शहरात दिवंगत हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार असल्याची घोषणा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी सायंकाळी भेटीदरम्यान केली आहे. सोमवारी ( ता.१९ ) रोजी साजरा होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी ते सोयगावात बोलत होते.
सोयगाव नगरपंचायत प्रशासनाने शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी जागेचा शोध घेण्यासह तातडीने प्रस्ताव सादर करण्याचा आदेश देखील अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.
कृषिमंत्री सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड येथे शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता सोयगाव शहरांत शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा संकल्प कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
येत्या वर्षभरात सदरील स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल तसेच आगामी वर्षी शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेबांच्या स्मारकास सोयगावात अभिवादन करून शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करू असे ना. अब्दुल सत्तार म्हणाले.
सोयगाव येथे शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारण्याच्या घोषणेनंतर तमाम शिवसैनिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सोयगाव येथील हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक जनतेसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करीत सोयगाव येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारण्याच्या घोषणेनंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे तालुकाप्रमुख प्रभाकर काळे म्हणाले.