Advertisement

मंत्रीपद धोक्यात असलेल्या मंत्र्यासह CM शिंदेंच्या 2 निकटवर्तीयांनी घेतली शरद पवारांची भेट

प्रजापत्र | Friday, 16/06/2023
बातमी शेअर करा

मुंबई - सत्ताधारी शिवसेनेतील 2 बड्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय विश्लेषकांनी भुवया उंचावल्या आहेत. या दोन्ही मंत्र्यांनी मुंबईहून जळगावपर्यंत एकाच डब्यात पवारांसोबत प्रवास केला. त्यात त्यांच्यात राज्यातील राजकीय घटनाक्रमासह विविध विषयांवर विस्तृत चर्चा झाल्याचे समजते.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अंमळनेर येथे शुक्रवारी होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय सेलच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मुंबई येथून राजधानी एक्सप्रेसने गुरुवारी जळगावला आले. त्यांच्यासोबत मुंबई येथून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, तसेच पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील जळगावला आले. या तिन्ही नेत्यांनी एकाच रेल्वेने एकाच डब्यात बसून वेगवेगळ्या मुद्यांवर सांगोपांग चर्चा करत जळगाव गाठल्याने राजकीय गोटात खमंग चर्चा रंगली आहे.

 

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

गुलाबराव पाटील व शरद पवार यांच्यातील चर्चेचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत. चिमणराव पाटील व शरद पवार यांचेही एकमेकांशी संवाद साधत असल्याचे फोटो व्हायरल झालेत. सत्ताधारी शिवसेना व भाजपमधील अंतर्गत मतभेदांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांची ही भेटाभेट झाल्यामुळे जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

 

पवारांचे मार्गदर्शन आमच्यासाठी महत्त्वाचे - पाटील

पत्रकारांनी यासंबंधी गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या भेटीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याशी राजकीय मुद्दे वगळता इतर विषयांवर चर्चा झाली. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला चांगलेच ठरणार आहे, असे ते म्हणाले.

 

 

गुलाबरावांचे मंत्रीपद धोक्यात ?

दुसरीकडे, भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची मागणी केल्याचे वृत्त आहे. या 5 मंत्र्यांमध्ये गुलाबराव पाटील यांच्या नावाचाही समावेश आहे. मंत्रीपदावर टांगती तलवार असताना गुलाबरावांनी शरद पवारांची भेट घेतल्यानेही यासंबंधी वेगवेगळ्या राजकीय अटकळी व्यक्त केल्या जात आहेत.

Advertisement

Advertisement