Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - जे घडलं ते बरं नाही

प्रजापत्र | Tuesday, 13/06/2023
बातमी शेअर करा

महाराष्ट्राला दिंडीची फार मोठी परंपरा आहे. या दिंड्यांच्या माध्यमातून शिस्तीचे, नियोजनाचे जे दर्शन होते, त्याची नोंद जगाने घेतलेली आहे. खऱ्याअर्थाने समाजातील सर्वसामावेशकपणा , अध्यात्म आणि मानवता यांचे मुर्तिमंतरूप असणारी दिंडी म्हणूनच महाराष्ट्राचे वैभव ठरलेली आहे. आजपर्यंत कधी या दिंडयांना पॉलिसी हस्तक्षेपाची आवश्यकता लागत नव्हती, मात्र मागच्या काही वर्षात दिंडीत 'धारकरी ' घुसविण्याची जी विकृती याच महाराष्ट्रात पाहायला मिळाली, खरेतर त्यावेळीच सर्वांनी सावध व्हायला हवे होते. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान  आळंदीहून पंढरपूरकडे होत असताना आळंदीत जे काही घडले ते महाराष्ट्राला  सर्वथा अनपेक्षित होते. यात चूक वारकऱ्यांची  का पोलिसांची , यावर बराच काळ खल सुरु राहील, पण आळंदीत जे काही घडलं ते बरं नाही, किमान महाराष्ट्राला शोभणारं नक्कीच नाही.

 

'जो जे वांच्छिल तो ते लाहो , प्राणिजात ' असे पसायदान सर्व जगासाठी ज्यांनी मागितले, त्या संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करीत असताना पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये जी झटपट झाली आणि पोलिसांनी वारकऱ्यांवर थेट लाठ्या चालविल्या, हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत होते . या साऱ्या प्रकारात वारकऱ्यांनी पोलिसांना ढकलले, का वारकऱ्यांना मंदिरात येऊ दिले जात नव्हते , कोणी घुसखोरी केली का आणखी काय झाले याबाबत आता वेगवेगळ्या गोष्टी समोर मांडल्या जात आहेत. वारकरी म्हणजे खऱ्या अर्थाने शिस्तीचे भोक्ते असतात , किंबहुना वारीतील शिस्तीची उदाहरणे घालून दिली जातात. संत ज्ञानेश्वरांच्या काय किंवा तुकोबांच्या, मुक्ताईंच्या काय, या सर्व पालख्या जेव्हा पंढरपूरकडे निघत असतात , त्यावेळी त्यांचे नियोजन अत्यंत अचूक असते, त्यात कधी गोंधळ झालेला आजपर्यंत पाहायला मिळालेला नाही, मग आळंदीतच पोलिसांनी थेट लाठीमार करावा असे काय आणि का घडले याचे चिंतन व्हायला हवे.
मुळातच पंढरीची वारी हा महाराष्ट्राचा लोकोत्सव आहे, याला अध्यात्मिक रंग आहे, मात्र हा हा अध्यात्मिक रंग कर्मकांडांनी काळवंडलेला नाही. पांडुरंगाचे भक्त घरदार सोडून महिनाभरासाठी या वारीत सहभागी होत असतात , त्यामुळे त्यांच्या भक्तिभावाला आंदोलकांचे स्वरूप नक्कीच देता येत नाही. आता सरकारकडून काही युवक वारकरी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करीत होते आणि त्यातून मग वाद निर्माण झाला हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र काही वॉलसारही तसे घडले हे मान्य केले तरी त्यावर पोलिसी बळाचा वापर हा मार्ग नक्कीच नव्हता. जे वारीचे व्यवस्थापन पाहतात, त्या अधिकाऱ्यांकडे दिंडी प्रमुखांचे संपर्क क्रमांक असतात, आळंदीच्या देवस्थानचे जे प्रमुख आहेत, त्यांच्याकडे सर्व माहिती असते, जर सरकार किंवा गृहमंत्री सांगत आहेत, त्या प्रमाणे कोणी घुसखोरी केलीच असेल तर त्यावर दिंडी प्रमुखांशी चर्चा करण्याचा मार्ग होताच, मात्र वारकऱ्यांवर लाठीमार करून वारीच्या उज्ज्वल परंपरेला गालबोट लावण्याचा प्रकार प्रशासनाकडून झाला आहे हे नक्की.
असेही मागच्या काही काळात वारीची बहुजन परंपरा हायजॅक करण्याचा प्रयत्न काही टोळक्यांकडून होत आहे. वारीमध्ये 'धारकरी ' घुसविण्याचे प्रकार यापूर्वी घडले होतेच. त्याला विरोध झाला, मात्र त्यावेळी विरोधाचा आवाज अधिक मोठा व्हायला हवा होता . तसे झाले असते तर वारीमध्ये घुसखोरीची विकृती पोसली गेलीच नसती. मुळात पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची लोकभावना आहे. या वारीत सहभागी होणार वारकरी हा अगदी सामान्य माणूस असतो. त्यामुळे अशा वारीवर लाठीमार करून वारीच्या परंपरेलाच गालबोट लावण्याचे जे प्रकार होत आहेत, ती विकृती आहे. त्यावेळी पोलिसांनी जो काही सौम्य म्हणा किंवा किरकोळ लाठीमार केला असे वारकरी सांगतात, त्याचे आदेश कोणाचे होते ? राजकीय सभांमध्ये यापेक्षा अधिक ढकलाढकली होते, टर्रेबाजी होते, त्यावेळी कधी पोलीस बळाचा वॊपर करीत नाहीत मग सामान्य वारकऱ्यांबद्दलच हे का ? याचे देखील उत्तर मिळायला हवे. का महाराहस्त्रात मागच्या काही काळात बहुजन चेतना, बहुजन संवेदना आणि बहुजन प्रतिमांना जे बदनाम कर्णयःचे प्रयत्न होत आहेत, आता अशा विकृतीच्या 'किड्यांचे ' पुढचे लक्ष वारी तर नाही ना ?

Advertisement

Advertisement