Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - पर्यावरणासाठी योगदान गरजेचे

प्रजापत्र | Monday, 12/06/2023
बातमी शेअर करा

'निसर्ग' हे मानव, वन्यजीव, जलचर प्राणी, पक्षी अन् वनसंपत्ती यांना लाभलेलं मोठं वरदान आहे. या पार्श्वभूमीवर निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी आधी आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करणं गरजेचं आहे. कारण, पर्यावरणाचा समतोल बिघडणे म्हणजे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणं होय. सध्याच्या काळात जल, वायू व ध्वनिप्रदूषणामुळे वसुंधरेचं स्वास्थ्य बिघडत चाललं आहे. कारण, प्रदूषणामुळे पर्यावरणाचं नुकसान होत असल्याची जाणीव नसणं, हे बौद्धिक मागासलेपणाचे लक्षण आहे.
 

     गेल्या आठवड्यात पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन झाला. गेल्या कांहीं वर्षांपासून अवकाळी पावसामुळे फार मोठे नुकसान होते आहे. पर्यावरण संतुलनात होणा-या बदलाने  माणसाचं जीवनमान दिवसेंदिवस कठीण होत आहे.वास्तविक पाहता, पर्यावरणामध्ये असमतोल निर्माण झाल्यास अवकाळी पाऊस, ऋतुमानात होणारे अचानक बदल, चक्रीवादळ, भूकंपाचे हादरे, अतितापमान, अतिपर्जन्यवृष्टी या नैसर्गिक आपत्ती उद्भवत आहेत.
       पर्यावरणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. पर्यावरण आणि मानव यांचे नाते अतूट आहे. पर्यावरणात सर्व जीवांचा समावेश होतो.शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या घटकांनी मिळून पर्यावरण बनले आहे. यामध्ये हवा, जमीन, पाणी, सर्व सजीव-निर्जिव, पर्जन्यमान, तापमान इत्यादी सर्वांचा समावेश होतो.
       जैवविविधतेचे जतन व संवर्धन करणे मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. यास्तव वसुंधरेचं देणं फेडण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी तुमची-आमची सर्वांची आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मानवी जीवन जगण्यासाठी पर्यावरण आवश्यक आहे.  ते आपल्याला अन्न, पाणी आणि निवारा यांसारखी महत्त्वपूर्ण संसाधने प्रदान करते. तथापि, जंगलतोड, प्रदूषण आणि हवामान बदल यासारख्या मानवी क्रियाकलापांचा पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला आहे, ज्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, जैवविविधतेचे नुकसान आणि हवामान बदल होत आहेत.
       हवा, पाणी, हवामान, माती, नैसर्गिक वनस्पती आणि भूस्वरूप हे सर्व पर्यावरणीय घटक आहेत. वैयक्तिक पातळीवर विचार केला असता, निसर्गाचे रक्षण करण्याची लोकांची क्षमता मर्यादित असू शकते परंतु असे उपाय केले जाऊ शकतात ज्यामुळे मोठ्या प्रमाणात फरक होऊ शकतो. बहुतेक कच-याचा पुनर्वापर, त्यासाठी कचरा काच, प्लास्टिक, धातू आणि बॅटरी कचर्‍ यामधून विभक्त करणे आणि कच-याची विल्हेवाट लावण्यापूर्वी विभक्त केलेला कचरा पुन्हा वापरात आणणे त्यामुळे नकारात्मक परिणाम होण्याचे प्रमाण खूप कमी करता येते. कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्याचा विचार केला पाहिजे. औद्योगिक क्षेत्रातून वातावरणात सोडल्या जाणार्‍या वायूंवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, वायूप्रदूषण पर्यावरणासाठी घातक आहे. लोकसहभागातून व्यापक प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबवून प्राणवायूचे भांडार निर्माण करणे गरजेचे आहे.
      संशोधकांचे अनेक गट आता पृथ्वीच्या आरोग्याचं सर्वांगीण मूल्यमापन करत आहेत. आगामी २० ते ३० वर्षांत आपल्या आयुष्यावर कोणते मोठे परिणाम दिसून येतील याचा अंदाज बांधत आहेत. आणि त्यातला धोका कमी करण्याचे मार्ग शोधत आहेत.हवामान, वायूप्रदूषण, खतांचा अतिवापर आणि त्यातल्या फॉस्फरस आणि नायट्रोजनने पाणी दूषित होणे, भूजलपुरवठा, गोड्या पाण्याची उपलब्धता, नैसर्गिक राखलेला परिसर आणि एकूणच नैसर्गिक आणि मानव-निर्मित पर्यावरण. यापैकी सहा गोष्टींमध्ये आपण धोक्‍याची पातळी ओलांडलेली आहे. फक्‍त वायू प्रदूषण हे जागतिकस्तरावर अजून धोकादायक मर्यादेच्या आत आहे. मात्र, स्थानिक पातळीवर ते कित्येकदा त्यापलीकडे जाताना दिसत आहे.पृथ्वी आणि पर्यायाने आपण सगळे धोक्‍याच्या सीमारेषेवर उभे आहोत ही वस्तुस्थिती या संशोधनात अधोरेखित झाली आहे. या धोकारेषेवरून आपण परतू शकतो का? या गटातील तज्ज्ञांच्या मते अजूनही आपण आपल्या वसुंधरेला आजारातून वाचवू शकतो, निरोगी स्थितीत आणू शकतो. त्यासाठी उपाय नक्‍कीच आहेत. कोळसा आणि पेट्रोलचा कमीतकमी वापर करणे, जमिनीचा कस वाढवत रहाणे, नद्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे, हे मार्ग आपल्याला ठाऊक नाहीत असं नाही. पण दुर्दैवाने आपण ते मार्ग न पकडता, चुकीच्या दिशेने चाललो आहोत आणि याचे गंभीर परिणाम येणाऱ्या काळात भोगावे लागणार असल्याचे संकेत आहेत.
     बीडला जिल्हा प्रशासनाने नुकतेच शहरापासून बिंदुसरा धरणापर्यंत बिंदुसरा नदीच्या दोन्ही काठावर वृक्षारोपण मोहीम राबवून ६००० वृक्षलागवड केली, पण आज त्याठिकाणी एकही झाड अस्तित्वात नाही. वृक्षलागवडीचा केवळ फार्स नको तर त्यासोबत वृक्षसंवर्धन होणं अपेक्षित आहे.
      नैसर्गिक क्षेत्रे आपली हवा स्वच्छ करण्यास, आपले पाणी शुद्ध करण्यास, अन्न आणि औषधे तयार करण्यास, रासायनिक आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यास, पूरपाणी कमी करण्यास आणि आपले रस्ते थंड करण्यास मदत करतात. वातावरणातील प्रदूषक किंवा हवामानाशी संबंधित घटनांचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. वायू आणि ध्वनी प्रदूषण आणि पारा सारख्या जड धातूंचा थेट संबंध दमा, श्रवण कमी होणे, निर्जलीकरण आणि हृदयविकार यांसारख्या आरोग्य समस्यांशी आहे.
      या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने शासकीय व अशासकीय संस्थांनी लोकसहभागातून जागोजागी वृक्षारोपण अभियान राबविले पाहिजे, त्यातून आपणास भरपूर प्रमाणात ‘ऑक्सिजन’ मिळू शकेल. त्याप्रमाणेच नद्या, नाले, समुद्राचे पाणी प्रदूषित होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अभयारण्ये व तेथील वृक्षवल्ली अन् नद्या, नाले, पर्वत, सागर ही वसुंधरेची कवचकुंडले आहेत. त्यांचे जतन व संरक्षण केल्यास पर्यावरणाचे रक्षण अन् संवर्धन हमखास होईल, परिणामी मानवी जीवन सुखकारक व आनंददायी होईल.
     'निसर्ग’ हे मानव, वन्यजीव, जलचर प्राणी, पक्षी अन् वनसंपत्ती यांना लाभलेलं मोठं वरदान आहे. या पार्श्वभूमीवर निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी आधी आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करणं गरजेचं आहे. कारण, पर्यावरणाचा समतोल बिघडणे म्हणजे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणं होय. सध्याच्या काळात जल, वायू व ध्वनिप्रदूषणामुळे वसुंधरेचं स्वास्थ्य बिघडत चाललं आहे. कारण, प्रदूषणामुळे पर्यावरणाचं नुकसान होत असल्याची जाणीव नसणं, हे बौद्धिक मागासलेपणाचे लक्षण आहे. पर्यावरणाच्या संवर्धनातून वसुंधरेचा बचाव करण्यासाठी जागतिक पातळीसह देशस्तरावर व व्यक्तिगतस्तरावर पर्यावरणवादी चळवळीची व्याप्ती वाढीस लागणे आवश्यक आहे. यातून लोकचळवळ उभारली तर ते सर्व घटकांच्या दृष्टीने निश्चितपणे अधिक लाभदायक ठरेल.
     पृथ्वीवरील मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन व्हावे, तसेच जल अन् वायुप्रदूषण थांबावे, जीवसृष्टीच्या दृष्टीने जीवनरक्षक कवच असलेला ‘ओझोन वायू’ चा थर कमजोर होणं, म्हणजे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणे होय. पर्यावरणाचा असमतोल झाल्याने अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, अतिवृष्टी, अतिउष्णतामान, ऋतुमानात होणारे बदल, भूकंपाचे हादरे येणे, या समस्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे सर्व थांबविण्यासाठी प्रत्येक सुजाण नागरिकांना जल-वायू प्रदूषण रोखण्यासाठी स्वयंस्फूर्तीने हिरिरीने पुढे यावे लागेल. पर्यावरण रक्षण व संवर्धनाच्या कामात राज्यातील युवा-युवतींसह शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अन् महिला मंडळे सर्वशक्तिनिशी सामील झाल्यास त्याला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होईल.जेणेकरून भविष्यात प्राणवायूअभावी समस्या निर्माण होणार नाहीत. अखिल मानवजातीचे रक्षण करण्यासाठी झाडं लावूया म्हणजे त्याद्वारे नैसर्गिकदृष्ट्या प्राणवायूनिर्मिती होऊन आपणास व आपल्या भावी पिढ्यांना सुरक्षित व आरोग्यदायी जीवन लाभेल यासाठी योगदान देवूया.

Advertisement

Advertisement