Advertisement

पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता

प्रजापत्र | Friday, 09/06/2023
बातमी शेअर करा

केरळमध्ये मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले आहे.  त्यामुळं आता महाराष्ट्रात मान्सूनचे (Maharashtra Monsoon) कधी आगमन होणार? याची वाट शेतकरी बघत आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया चालली आहेत. अशातच एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात मध्यम पावसाची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. 

 

या भागात पावसाची शक्यता
पुढील तीन दिवस म्हणजे १२ जूनपर्यंत राज्यातील मुंबईसह कोकण, खान्देश नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. दरम्यानच्या काळात मराठवाडा विदर्भात मात्र ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे. 'बिपॉरजॉय' चक्रीवादळ (Cyclone Biparjoy) सकाळी गोवा ते येमेन देशाच्या आग्नेय किनारपट्टी दरम्यान सरळ रेषेत जोडणाऱ्या अंतराच्या मध्यावर खोल अरबी समुद्रात आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर त्याची विशेष नुकसानदेही परिणाम होण्याची शक्यता कमीच वाटत असल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे. 

 

मान्सूनने केरळचा संपूर्ण भाग आणि तामिळनाडूचा ३० टक्के भाग व्यापला 
एक जून या सरासरी तारखेला केरळात आदळणारा मान्सून चार दिवस उशिराने म्हणजे चार जूनला येणं अपेक्षित होतं. त्यातही कमी अधिक चार दिवसाचा फरक जमेस धरून तो केरळात एक जून ते आठ जून या आठ दिवसादरम्यान कधीही दाखल होवु शकतो, असेच भाकीत भारतीय हवामान खात्याकडून यावर्षी  आगमनासंबंधी वर्तवले गेले होते. त्याप्रमाणं मान्सून गुरुवार दिनांक ८ जुनला  केरळमध्ये दाखल झाला आहे. हा दाखल झालेला नैऋत्य मान्सून आगमनाच्या अटी पुर्ण करून दाखल झाला आहे. जवळपास कव्हर करून देशाच्या भुभागावर दाखल झाला आहे. त्याची उच्चतम सीमा केरळातील कनूर आणि तामिळनाडूतील कोडाईकनल तसेच आदिरामपट्टीनाम शहरातून जाते.

 

मान्सून दाखल होण्याच्या घोषणेसाठी हव्या असलेल्या अटीपैकी चार अटी पुर्ण
१) अरबी समुद्रातून पश्चिमेकडून पूर्वेकडे समुद्रसपाटीपासून उंच आकाशात जमिनीपासून सहा किमी जाडीपर्यंत वाहणारे समुद्री वारे
२) केरळकडे जमीन समांतर ताशी ३० ते ३५ किमी वाहणारे समुद्री वारे
३) आग्नेय अरबी समुद्रात आणि केरळ किनारपट्टी समोरील अलोट ढगाची दाटी
४) संध्याकाळी अरबी समुद्रातून पाणी पृष्ठभागवरून अवकाशात प्रति चौरस मिटर क्षेत्रफळावरून १९० व्याट्स म्हणजे २०० व्याट्स पेक्षा कमी वेगाने उत्सर्जित होऊन बाहेर फेकणारी दिर्घलहरी उष्णता ऊर्जा 

Advertisement

Advertisement