Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - क्रूरतेची जात कोणती?

प्रजापत्र | Friday, 09/06/2023
बातमी शेअर करा

दिल्लीमध्ये घडलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाला एक वर्ष उलटले आहे. तोच आता मुंबईच्या मीरारोड भागात श्रद्धा वालकर प्रकरणही लाजवेल असे नृशंस हत्याकांड समोर आले आहे. आपल्या सोबत लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या साथीदाराचा खून करून तिच्या मृत शरीराचे तुकडे तुकडे आणि ते देखील घरातील मिक्सर ग्राईंडरच्या साह्याने करण्याचा अमानवी प्रकार घडल्याने आता समाज क्रूरतेची कोणती पातळी गाठणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईत हे होत असताना इकडे बीड जिल्ह्यात घरात तीन दिवसावर लग्न आलेले असताना जावयाने सासऱ्याचा खून केल्याची घटना असेल किंवा नांदेड जिल्ह्यात घडलेली अक्षय भालेरावची हत्या, गुन्हा कोणताही असो त्याला जात आणि धर्म नसतो, मात्र कोणत्याही गोष्टीला जातीशी किंवा धर्माशी जोडण्याचा कैफ असलेल्या मूठभर लोकांसाठी आता मीरारोड प्रकरणाने आणि इतरही घटनांनी क्रूरतेचीच जात कोणती असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
 

 

मुंबईच्या मीरारोड परिसरात मनोज साने या ५६ वर्षाच्या व्यक्तीने त्याच्या सोबत लिव्ह इन मध्ये राहत असलेल्या सरस्वती वैद्य या ३२ वर्षीय महिलेचा अमानवी पद्ध्तीने खून केल्याचे समोर आले आहे. या घटनेने सारी मुंबईच नव्हे तर देश हादरला आहे. एखाद्या व्यक्तीचा खून करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्याचे आणि पुन्हा ते घरातच ठेवण्याचे अमानवी कृत्य यापूर्वी देखील देशात घडलेले आहे, नाही असे नाही, मात्र मागच्या वर्षीच्या मे महिन्यात दिल्लीत श्रद्धा वालकर या महिलेच्या बाबतीत असा प्रकार समोर आल्यानंतर देशभरात अशा प्रकरणांवर पुन्हा एकदा चर्चा झाली होती. श्रद्धा वालकर प्रकरणाचे देशभरात जे पडसाद उमटले होते, त्यामुळे पुन्हा असे प्रकार होणार नाहीत अशी भाबडी अपेक्षा होती, मात्र श्रद्धा वालकर प्रकरणात त्यातील क्रूरतेपेक्षाही आरोपीची जात आणि धर्म यावरून समाजमन भडकवण्याचे काम विशिष्ट वर्गाकडून झाले आणि त्यानंतर वर्षभर श्रद्धा वालकर प्रकरणाचा उपयोग कधी लव्ह जिहाद तर कधी आणखी काही गोष्टी समाजाच्या माथी मारण्यासाठी झाला, मात्र आरोपी कोणीही असो, त्याच्यात इतकी क्रूरता येते कोठून यावर मात्र चिंतन करण्याची आवश्यकता समाज म्हणून कोणाला वाटली नाही. आता श्रद्धा वालकर प्रकरणाला देखील लाजवेल अशी घटना मुंबईत समोर आली आहे. गुन्हा आणि गुन्हेगाराला जात नसते असे आमचे ठाम मत आहे, त्यामुळे या घटनेतील आरोपी आणि पीडित कोण यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाहीच, मात्र आता तरी जात धर्माच्या पलीकडे जाऊन समाजात वाढत असलेल्या क्रूरतेवर आम्ही भाष्य करणार आहोत का नाही?
प्रश्न एकट्या श्रद्धा वालकर, किंवा मीरारोड प्रकरणाचा नाही मागच्या काही काळात समाजातील हिंसक वृत्ती ज्या पद्धतीने वाढत आहे, ते खरोखर चिंतेचे आहे. बीड जिल्ह्यात घरात तीन दिवसावर लग्न आलेले असताना जावयाने सासऱ्याचा खून केल्याची घटना असेल किंवा नांदेड जिल्ह्यात घडलेली अक्षय भालेरावची हत्या दिवसाढवळ्या मुडदे पाडण्याचे कोणालाच काहीच वाटत नाही आणि कायद्याचा धाक देखील संपत चालला आहे हेच यातून समोर येत आहे. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत असल्याच्या चर्चा अधून मधून होतात, त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होतात मात्र एकंदरीतच समाजात हिंसक वृत्ती का वाढते आहे? याचे चिंतन होणे आणि त्या दृष्टीने अशा गुन्ह्यातील आरोपींचे मानसशात्रीय विश्लेषण होणे आवश्यक आहे.             
     ज्यांच्यासोबत आपण राहतो, ज्यांच्यासोबत कोणत्या तरी नात्याने बांधलेले असतो, त्यांना सहजपणे आणि अमानवी पद्धतीने संपविताना जर हात थरथरत नसतील तर नक्कीच त्या व्यक्तीमध्ये आलेला जो पाशवीपणा आहे त्याचे मूळ शोधणे ही काळाची गरज ठरणार आहे. मागच्या काही काळात माध्यमांमधून असेल, समाजमाध्यमांमधून असेल , हिंसेचे, द्वेषाचे जे उदात्तीकरण चालले आहे, राजकीय सामाजिक, परिप्रेक्ष्यातून जो द्वेष पसरविला जात आहे त्यातून अशा हिंसक मानसिकतेला खतपाणीच मिळत आहे याचा विचार समाजाने करण्याची आवश्यकता आहे.
     मागच्या काळात कायद्याचा जो काही म्हणून धाक असावा लागतो, तो धाक देखील संपलेला आहे. कोणत्याही प्रकरणाला जात आणि धर्माचे कवच लावून संरक्षण मिळविता येते हे देखील अनेक प्रकरणात समोर आले आहे. एखादे प्रकरण आले तर तातडीने कारवाई होते, मात्र इतर सर्वच प्रकरणांमध्ये अशी तातडीची कारवाई होत नाही हे देखील वास्तव आहे, त्यामुळेच काहीही केले तरी काही होत नाही, हा जो एक माज चढलेली विकृती समाजात फोफावत आहे, त्याचेही मनोविश्लेषण होणे आवश्यक आहे. क्रूरता, गुन्हा, गुन्हेगार यांना जात नसते आणि त्यांना जाती, धर्माच्या चष्म्यातून पाहण्यापेक्षा अशी मानसिकतेच्या कार्यकारणभावावर जोपर्यंत विचार आणि तो रोखण्यासाठीही कृती होणार नाही, तोपर्यंत समाजातील अस्वस्थता वाढतच जाणार आहे

Advertisement

Advertisement