Advertisement

पैसे देऊन देखील सातबारा दुरुस्त होत नाही, आम्ही जायचं तरी कुठं ? '

प्रजापत्र | Saturday, 03/06/2023
बातमी शेअर करा

बीड दि. २ (प्रतिनिधी) 'साहेब तीन वर्ष झाली, सातबारावरचे क्षेत्र कमी झाले आहे, विहिरींची नोंद आहे, पण वाटणीची नाही, हे दुरुस्त करा म्हणून तलाठी, मंडळ अधिकारी सर्वांना भेटतोय , लई चकरा मारल्या, दुरुस्तीसाठी पैसे बी दिले, पण काम होत नाही, मला बीडला यायचं तर तीन किलोमीटर पायी चालत यावं लागत , आम्ही करायचं तरी काय ?'  असे म्हणत चक्क तहसीलदारांच्या दालनातच टाहो फोडण्याची वेळ बीड तालुक्यातील एका शेतकऱ्यावर आली आहे. गुंडवाडी सज्जात हा शेतकरी हे केवळ एक उदाहरण आहे. जिल्हाभरात तलाठी, मंडळ अधिकारी वेळेवर फेरफार आणि सातबारा दुरुस्ती करीत नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.
बीडच्या तहसील कार्यालयात दोन दिवसापूर्वी एक शेतकरी आला, हातात साधी पिशवी आणि त्यात कागदाचं भेंडोळ. तीन वर्षांपूर्वी सातबारा संगणकीकरणात शेताचे क्षेत्र सातबारावर कमी लागले, त्यानंतर दोन भावात सामायिक विहीर आहे, त्याची नोंद आहे, पण विहिरींची वाटणी किती याची नोंद नाही, आता सौर ऊर्जेच्या योजनेचा लाभ घ्यायचा तर अधिकारी विहिरींची नोंद मागतात. तीन वर्षांपासून तलाठ्यांना सांगतोय, मंडळ अधिकाऱ्यांना सांगतोय, पण मला खेळवतात, अगोदर कोरोनाच कारण सांगितलं, घरातले आजरी आहेत मानल्यावर आम्ही गप बसलो, कोरोना गेला , त्यानंतरही अनेक चक्र मारल्यात पण तलाठी, मंडळ अधिकारी काम काही करीत नाहीत. काम व्हावं म्हणून पैसे पण दिले तरीही काम होत नाही, कोणीतरी सांगितले, इथं त्यांचे मालक बसतेत म्हणून तुमच्याकडं आलो ' असं म्हणताना त्या शेतकऱ्याला रडू फुटले.
बीडमधील हा प्रसंग प्रातिनिधिक आहे. जिल्हाधिकरी आणि तहसीलदार कितीही फेरफार अदालती घेत असले आणि दौरे करीत असले तरी गाव पातळीवरील यंत्रणा शेतकऱ्यांना नाडायचे सोडीत नाही आणि सारेच शेतकरी तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत येऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेकांना रडावे कोठे हा देखील प्रश्न आहे. आणि प्रशासनाने केलेल्या अडचणी सध्या शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरल्या आहेत. यासंदर्भात प्रशासनातले बडे अधिकारी काही तोडगा काढणार आहेत का ?

Advertisement

Advertisement