Advertisement

प्रजापञ अग्रलेख - गोपीनाथराव असते तर

प्रजापत्र | Saturday, 03/06/2023
बातमी शेअर करा

खरं तर कोणत्याही व्यक्तीच समाजात, कुटुंबात, समूहात असणं हे महत्वाचं असतं, कारण त्यांच्या असण्याचा परिणाम साहजिकच त्या कुटुंबावर, समूहावर होत असतो. मात्र काही मोजक्याच व्यक्ती अशा असतात ज्यांचं नसणं केवळ एखाद्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला मागे नेऊ शकते. कोणत्याही व्यक्तीच्या निधनानंतर पोकळी निर्माण होत असतेच, काही काळाने ती पोकळी भरून निघतेही, मात्र काहींच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघत नाही. समाजात काहीही घडल्यावर 'आज ते असते तर ... ' असा विचार समाजमन सहजपणे करते, अशा मोजक्या व्यक्तींपैकी एक होते ते गोपीनाथ मुंडे . राज्याच्या केवळ राजकारणातच नव्हे तर समाजकारणातही त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी अजूनही भरून निघालेली नाही. किंबहुना आज जर गोपीनाथ मुंडे असते, तर भाजपच्या राजकारणाची सामान्यांना घृणा वाटावी अशी जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती कदाचित निर्माण झालीच नसती, किमान महाराष्ट्रात तरी.

 

 

      दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृती दिन. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातलं एक आश्चर्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, त्या गोपीनाथ मुंडेंचं ९ वर्षांपूर्वी जाणं जितकं अकाली आणि धक्कादायक होतं, ती वेदना आज ९ वर्षांनंतरही ताजी आहे. मुळात गोपीनाथ मुंडे हे केवळ मुंडे कुटुंबाचे किंवा एखाद्या मतदारसंघाचे उरलेले नव्हते, तर राज्याच्या आणि देशाच्या राजकारण, समाजकारण आणि सत्ताकारणावर देखील प्रभाव टाकू शकणाऱ्या मोजक्या व्यक्तींपैकी ते एक होते. महाराष्ट्राच्या राजकारणातून पुढे आलेल्या ज्या काही मोजक्य लोकांची दिल्लीला देखील दखल घ्यावी लागायची, त्यात यशवंतराव चव्हाण , एस एम जोशी, मधु लिमये, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार , प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे अशी काही नावे होती. त्यातील आता केवळ शरद पवार आहेत, आणि म्हणूनच महाराष्ट्राची राष्ट्रीय राजकारणाची पोकळी फार मोठी झालेली आहे.

 

     गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारण, समाजकारणाचे कंगोरे अनेक होते. गोपीनाथराव नेमके कोणत्या विचारांचे होते हे आज स्पष्ट सांगताच येऊ शकत नाही . भाजपसारख्या संघाच्या मुशीतून आलेल्या, कर्मठ पक्षात राहून गोपीनाथ मुंडे बहुजनांचा आवाज बोलायचे, ओबीसींच्या प्रश्नांवर भाजपची भूमिका मंडल आयोगाच्या वेळीच स्पष्ट झालेली असताना देखील, गोपीनाथ मुंडे ओबीसी जनगणनेसाठी प्रसंगी पक्षाला अंगावर घ्यायला तयार असायचे, मुस्लिम समाजाला देखील गोपीनाथ मुंडे हा विश्वासू चेहरा वाटायचे, समाजातल्या अत्यल्प घटकांना गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल विश्वास वाटायचा . समाजवादी असतील, डावे असतील किंवा इतर पुरोगामी विचारांचे लोक, त्यांना गोपीनाथ मुंडे कधी परके वाटले नाहीत, म्हणूनच सर्व समाजघटकांना आपलेसे वाटणाऱ्या व्यक्तिमत्वाचे नसणे आज महाराष्ट्राच्या समाजकारणासमोरची देखील मोठी पोकळी आहे.

 

     आज भाजपचे जे जे हुकूमशाहीची धोरण सगळीकडे सुरु आहे, सुडाचे राजकारण जे सुरु आहे, ते गोपीनाथ मुंडेंना कधीच रुचले नसते. आज केवळ मुंडेंच्या राजकीय वारसदार असलेल्या पंकजा मुंडेंचीच नव्हे तर मुंडेंनी ज्यांना सोबत घेऊन भाजप वाढविला, त्या सर्वच नेत्यांची जी राजकीय गोची झालेली आहे, मुंडे असते तर ती नक्कीच झाली नसती. ओबीसींच्या आरक्षणाच्या विषयावरून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा जो खेळखंडोबा झाला आहे तो देखील मुंडे असते तर झाला असता का हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.

 

      गोपीनाथ मुंडेंचे राजकारण हे बेरजेचे होते, म्हणूनच त्यांच्या काळात त्यांनी अनेकजणांना पक्षासोबत घेतले. त्यांचे अनेकांशी मतभेद झाले, मात्र राजकारणात कोणीच कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, म्हणत त्यांनी अनेकांना जवळ केले, काही जण दुरावले, पुन्हा जवळ आले, ही निरंतर प्रक्रिया त्यांच्या राजकारणाचा भाग होती. त्यांच्या स्वतःच्या बीड जिल्ह्यात ओबीसी केंद्री राजकारण करतानाच सोळंके, पंडित आदी घराण्यांना पुन्हा राजकीय प्रवाहात येण्यासाठी बळ देण्यामधली त्यांची भूमिका महत्वाची होतीच. हेच राज्याच्या राजकारणाबाबतही लागू होते. कधी मोहिते, कधी निलंगेकर तर आणखी कोणी, हर्षवर्धन पाटलांसारखे व्यक्ती भाजपशी जोडले गेले ते मुंडेंमुळेच. संघातून आलेल्या वसंतराव भागवतांनी महाराष्ट्रात सत्ता मिळवायची असेल तर या राज्यातील बहुसंख्य असणाऱ्या बहुजन समाजातील माधवं (माळी , धनगर , वंजारी) हे सूत्र दिले, पण ते प्रत्यक्षात उतरविले ते गोपीनाथ मुंडेंनी. त्यासोबतच बंजारा समाजाची राजकीय अस्मिता फुलविणे आणि वाढविणे असेल किंवा इतर समाजघटकांना सोबत घेणे असेल, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ या काही नेत्यांमुळेच कोणत्याही पक्षातील ओबीसी, बहुजन चेहऱ्यांची फरफट होत नसायची. आज सर्वच राजकीय पक्षात बहुजन चेहऱ्यांच्या संदर्भाने जे चित्र दिसत आहे, ते दिसले नसते.

 

      महाराष्ट्रात भाजप सेना युतीचे जे शिल्पकार होते, त्यात भाजपच्या बाजूने प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हेच होते. गोपीनाथ मुंडेंना शिवसेनेची किंमत माहित होती, त्यांनी कधी सेनेसोबत दुरावा येऊ दिला नाही, त्यांच्या काळात सेनेचे खच्चीकरण झाले नाही असे नाही, १९९९ ला राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एक दोन वेळा काँग्रेसचे सरकार जाऊन सेना भाजपचे सरकार येऊ शकते अशी परिस्थिती झाली होती, एकदा तर नारायण राणेंनी सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार देखील सोबत घेतले होते, मात्र त्यावेळी गोपीनाथ मुंडेंनी फारसा रस दाखविला नाही, बीड सारख्या जिल्ह्यात आज शिवसेनेची जी अवस्था आहे, त्याला गोपीनाथ मुंडे देखील तितकेच जबादार मात्र असे असले तरी सेनेच्या आत्मसन्मानाला मुंडेंनी कधी धक्का लागू दिला नाही. आज जी खूनशी वृत्ती राज्याच्या आणि देशाच्या भाजपमध्ये आहे आणि ज्यामुळे मित्रपक्ष दुरावत आहेत, ते मुंडेंनी किमान महाराष्ट्रात तरी नक्कीच होऊ दिले नसते. बाकी कितीही उशीर झाला तरी ज्यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंचा जमाव उभाच राहायचा, आपली दुःख ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून सांगता येतात असा विश्वास सामन्यांना होता असे गोपीनाथ मुंडेंसारखे चेहरे आता अपवादानेच राहिले आहेत. राजकारण, समाजकारण आणि व्यक्तिगत जनता या सर्वांच्याच बाबतीत मुंडेंच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी अजूनही भरून निघत नाही. उलट आज ते हवे होते ही भावना अधिकच प्रकर्षाने वाढीस लागत आहे.

 

Advertisement

Advertisement