Advertisement

मटणाचे पिस कमी वाढल्यावरुन झाला वाद

प्रजापत्र | Wednesday, 31/05/2023
बातमी शेअर करा

 औरंगाबाद - औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील एका गावात विचित्र घटना समोर आली असून, मटणाचे पिस कमी वाढल्याने एका मित्राने दुसऱ्या मित्राची थेट हत्या केली आहे. शेतात पार्टी करताना हा सर्व प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आरोपी आणि मयत दोन्ही परप्रांतीय कामगार आहेत. जितेंद्र काशीराम धुरवे (वय 34 वर्षे, रा. हनुमंता टापू, ता. मुंडी, जि. खंडवा, मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे तर ओमजय जगदीश सुरेश रघुवंशी- ठाकूर (वय 35 वर्षे, रा. छोटी पोलिस लाइनजवळ, हरदा, मध्यप्रदेश) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

 

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील जितेंद्र धुर्वे व ओमजय जगदीश रघुवंशी हे दोघे मित्र आहेत. दोघेही सिल्लोड तालुक्यातील धारला येथील शेतकरी त्र्यंबक झाबू सोनवणे यांच्याकडे काही दिवसांपूर्वी  मोलमजुरीसाठी आले होते. त्यामुळे शेतात लावलेल्या मिरचीची राखण करणे व इतर कामे करण्यासाठी त्यांना शेतात सालदार म्हणून ठेवण्यात आले होते. दरम्यान या दोघांनी सोमवारी रात्री मटणाची पार्टी केली. मात्र, मटणाचे पिस कमी जास्त घेण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद सुरु असताना शेतकरी परसराम सोनवणे व त्र्यंबक सोनवणे यांनी समजूत घालून तो सोडविला. त्यानंतर दोघेही शेतकरी घरी गेले.

 

 

स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांचा वाद सोडवून घरी गेल्यावर, रात्री 11 वाजेदरम्यान पुन्हा या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी आरोपी ओमजयने जितेंद्रचे हातपाय तोडून त्याचा खून केला व शेजारी शेतात झोपून राहिला. सकाळी दूध काढण्यासाठी परसराम सोनवणे व त्र्यंबक सोनवणे शेतात आले असता, त्यांना जितेंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी झोपलेल्या आरोपी ओमजयला विचारले असता, त्याने मीच त्याचा खून केल्याचे सांगितले. दरम्यान याची माहिती तात्काळ पोलीसांना देण्यात आली. तर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
 

Advertisement

Advertisement