समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्याची सरकारने घाई केल्यानेच या महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांबाबत काही त्रुटी राहिल्याची ओरड होत असतानाच आता राज्य सरकारने या महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण केले आहे. मागच्या काही काळात समृद्धी महामार्ग हा अपघात मार्ग बनलेला असतानाच आता दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले आहे. वेगवान वाहतुकीसाठी समृध्दीसारखे महामार्ग हवेच आहेत, याबाबत दुमत असण्याचे काहीच कारण नाही , मात्र हे करताना अपघात रोखण्यासाठी व्यवस्था काय आहे ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिर्डीमध्ये समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आले. शिर्डी ते इगतपुरी हा ८० किलोमीटरचा हा टप्पा आहे. शिर्डी ते इगतपुरी हा ८० किलोमीटरचा हा टप्पा आहे. गेल्या डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या ५२० किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. त्यानंतर आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर, नागपूर ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर गावापर्यंतचा एकूण ६०० किमीचा रस्ता खुला झाला आहे. कोणत्याही भागाच्या विकासासाठी दळणवळण आवश्यक असते. वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये चांगले रस्ते महत्वाचे असतात . त्यामुळे समृद्धी सारखे महामार्ग व्हायलाच पाहिजेत . पण मागच्या काही दिवसातला समृद्धी महामार्गाचा अनुभव काय आहे ? तर हा महामार्ग अपघात मार्ग बनला आहे. अत्यंत कमी कालावधीत या महामार्गावर मोठ्याप्रमाणावर अपघात झाले आहेत. पाच महिन्यात ३५८ अपघात, ५० पेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू आणि अनेकजण जखमी हा समृद्धीच्या पहिल्या टप्प्याचा प्रगती अहवाल आहे. अपघातांचे हे प्रमाणच, या महामार्गाच्या बांधणीत काही तरी त्रुटी आहेत हे दाखवायला पुरेसे आहे.
मुळात समृद्धी महामार्ग हा बऱ्यापैकी सरळ आहे . या महामार्गाची जाहिरात करतानाच आता 'सुसाट ' सुटता येणार असे सांगितले गेले. पर्यायाने या महामार्गावर वाहनांच्या वेगावर फारशा मर्यादा राहिल्याचं नाहीत . त्यातच कमी वळणांचा, मोकळा असा रस्ता यातून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गाच्या बांधणीत त्रुटी असतानाही , पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची घाई केली गेली असे आक्षेप अनेकांनी नोंदवलेले आहेत. मात्र सरकार म्हणून केंद्र किंवा राज्यातील कोणी या अपघातांवर अद्यापही बोललेले नाही. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी देखील यावर भाष्य करायला तयार नाहीत यातील बहुतांश अपघात हे 'रस्ता संमोहन ' अर्थात रॉड हिप्नोसिसमुले होतात, असा प्राथमिक अहवाल आहे. त्यामुळे अनेक संस्थांनी या महामार्गावरील काही ठिकाणे वेगवेगळ्या रंगांनी रंगविण्याची सूचना केली होती, मात्र त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. या दुरुस्त्यांसंदर्भात काही निर्णय घेण्यापूर्वीच आता दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे पहिलेच नीट झालेले नसताना दुसरा टप्पा सुरु करण्याची घाई करून सरकार नेमके काय साधणार आहे ?
रस्ते, महामार्ग यांचे जाळे जसे आवश्यक असते , तसेच हे रस्ते सुरक्षित कसे होतील हे पाहणे देखील महत्वाचे असते . आणि जे लोक महामार्गाचे श्रेय घेतात , त्यांना या महामार्गावरील अपघातांच्या अपश्रेयांची देखील जबाबदारी घ्यावी लागेल, त्यातून त्यांची सुटका होणार नाही. ज्या रस्त्याच्या कामांबद्दल अनेक आक्षेप आहेत,त्यावर काही भाष्य करण्याऐवजी केवळ उदघाटनामध्ये सरकार रमणार असेल तर सामान्यांच्या सुरक्षेचे काय ?