Advertisement

जिल्ह्यातील बसस्थानकांना चोरट्यांकडून लक्ष

प्रजापत्र | Thursday, 18/05/2023
बातमी शेअर करा

आष्टी दि.18 (प्रतिनिधी): सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे बसस्थानक प्रवाशांनी तुडूंब भरलेले आहे. जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असून बसमध्ये बसण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर धक्काबुक्की होत आहे. या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेण्यास आता सुरूवात केली असून अंबाजोगाई, बीड पाटोेपाठ आष्टीत महिलेचे दागिणे चोरीला गेल्याचा प्रकार गुरूवारी (दि.18) दुपारी 3:30 च्या सुमारास समोर आला. मागच्या काही दिवसांपासून बसस्थानकाला चोरट्यांनी लक्ष केले असतांना पोलीसांना ‘त्या’ चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यश आले नसल्याचे चित्र जिल्हाभर पहायला मिळते.

आष्टी शहरातील प्राध्यापक कॉलनीत राहणारे प्रा.व्ही.एल. शिंदे हे त्यांच्या पत्नीला पुणे येथे जाणार्‍या बसमध्ये बसुन देण्यासाठी गेले होते. पुण्याकडे जाणार्‍या बसमध्ये चडत असतांना प्रा. शिंदे यांच्या पत्नीच्या गळ्यातील सात तोळ्याचे गंठण चोरट्यांनी तोडले.

यावेळी ही बाब तात्काळ समजल्याने श्रीमती शिंदे यांनी तुटलेले गंठण आपले पती व्हि.एल. शिंदे यांच्याकडे दिले, त्यानंतर त्यांच्या पतीने ते गंठण आपल्या पॅन्टच्या खिशामध्ये ठेवले व त्या बसमधून उतरत पुण्यासाठी जाणारी नवीन बस शोधली मात्र चोरट्यांनी या कुटुंबियांना दुसर्‍याबसमध्येही लक्ष केले. यावेळी व्हि.एल. शिंदे यांच्या पॅन्टचा खिसा कापून 7 तोळ्यांचे गंठण बसस्थानकातून भर दुपारी लांबविण्यात आले. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली. आष्टी पोलीसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस कर्मचारी, महाराष्ट्र परिवहन मंडळाचे कर्मचारी आणि पञकारांनी बस स्थानकातील सीसीटीव्ही तपासले माञ त्यातुन काहीही निष्पन्न झाले नाही. या प्रकरणी आष्टी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असुन आष्टी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

 

 

प्रवाशांची सुरक्षा वार्‍यावर

आष्टी बस स्थानक हे प्रवाशांसाठी सुरक्षित राहिलेले नाही.येथे नविन बस्थानकाचे बांधकाम सुरू असल्याने बस स्थानकात प्रवाशांसाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे नेहमीच बस स्थानकात गर्दी असते. तसेच या बस स्थानकात पोलीस देखील गस्त करत नाहीत. तर परिवहन महामंडळाने बस स्थानकात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील काहीच उपयोगाचे नसून अनेक महत्त्वाच्या जागेवर ते लावलेले आहेत.परिवहन महामंडळ आणि पोलिसांचे होणारे दुर्लक्ष यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे दिसुन येते.

Advertisement

Advertisement