कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'केरला स्टोरी ' या चित्रपटाने देशभरात सनसनाटी निर्माण केली. त्यानंतर हा वाद न्यायालयात जाताच हरवलेल्यामुलींची संख्या कमी असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. हे होत असतानाच आता महाराष्ट्रातून अमुक इतक्या मुली गायब झाल्याची बातमी आली आहे. साहजिकच या बातमीला पुन्हा एकदा सनसनाटीचे स्वरूप दिले जात आहे. मुळातच या मुली हरवल्या असे सांगितले जात असले तरी त्यांचे अपहरण होण्याची उदाहरणे नक्कीच नाहीत . यातील बहुतांश मुलींचे विवाह झाले असल्याचीच शक्यता जास्त आहे. मग असे असताना या प्रकरणाला वेगळे वळण देण्याची आवश्यकता हाय आहे? कोणतीही मुलगी जेव्हा घर सोडते, त्यावेळी ते चिंताजनक नक्कीच असते , मात्र त्यातून केवळ सनसनाटी शोधण्यापेक्षा याच्या कारणांचा विचार आणि मुलींच्या स्वतःच्या 'अवकाशाचाही ' विचार करणे आवश्यक आहे.
कथित लव्ह जिहाद काय किंवा किंवा मुलींचे प्रेमविवाह काय, यात समाज म्हणून साऱ्या समाजाने लक्ष घालण्याची खरोखर आवश्यकता आहे का ? हा मोठाच प्रश्न आहे. मात्र स्वतःच्या राजकीय सोयीसाठी काही लोकांना असले मुद्दे पेटवायचेच असतात . म्हणूनच कर्नाटक निवडणुका जोरात असतानाच 'केरला स्टोरी ' सारखा चित्रपट येतो. त्यावरून वाद सुरु असतानाच कोणतेतरी धर्मगुरू लाखो मुली गायब होत असल्याचे सांगतात , तर महाराष्ट्रासारख्या राज्यातून अचानक दिवसाला ७० मुली गायब होत असल्याची माहिती पेरली जाते. याठिकाणी पेरली जाते यासाठी म्हणायचे की आज अचानक अशा बातम्या येण्यामागचे कारण काय ? साधारणतः ज्यावेळी राष्ट्रीय क्राईम ब्युरोचा अहवाल प्रसिद्ध केला जातो, त्यावेळी अशा प्रकारच्या आकडेवारीचे विश्लेषण होत असते. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मग असा कोणताही अहवाल नसताना, कोणीतरी या बातमीवर 'काम करीत ' असेल तर हे आताच का ? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. या माध्यमातून जी एकप्रकारची सनसनाटी निर्माण केली जात आहे, त्यातून नेमके काय ध्वनित करायचे आहे ? याचाही विचार केला जाणे आवश्यक आहेच .
मुळातच समाजातील काही संस्कृतीच्या कथित ठेकेदारांना असले काहीतरी विषय कायम हवेच असतात. असले काही झाले की मग संस्कृती, सभयता आणि अर्थातच धर्म कसा धोक्यात आहे असले काही सांगून धार्मिक ध्रुवीकरण करायला हे लोक तयार असतातच. त्यातून ते ज्या वर्गासाठी झटत आहेत त्यांचे राजकीय हित साधले जाते. असले कथित संस्कृतीरक्षक कमी अधिक फरकाने सर्वच धर्मात असतात. त्यामुळे राज्यात सरासरी अमुक मुली रोज गायब होतात, या बातमीकडे सनासनाटीच्या पलीकडे जाऊन त्याचा सामाजिक विचार करण्याची आवश्यकता आहे.
मुळात मुली गायब झाल्या म्हणून हे जे आकडे समोर आले आहेत, ते अर्थातच पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या तक्रारींचे आहेत. यातील किती तक्रारी केवळ द्यायच्या म्हणून दिल्या आहेत, हे वागले सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या मुलीने प्रेमविवाह केला आहे, हे माहित असतानाही यातील अनेक तक्रारी दिल्या जातात. किंवा मुलगी कोठे आहे हे माहित असतानाही तक्रारी दिल्या जातात. अनेकदा मुलगी पालकांना 'आम्ही अमुक ठिकाणी आहोत आणि आम्ही लग्न केले आहे ' असे सांगितल्यानंतरही त्या तक्रारी नोंदविलेल्या तशाच राहतात . त्यामुळे या प्रकारच्या बातम्यांमधून सूचित काय करायचे असते, तर प्रेमविवाहांचे प्रमाण किती वाढले आहे तेच. आणि एकदा का पुन्हा ही पत्री पकडली, की त्याला पुन्हा धार्मिक रंग आहेच. मुळातच कोणत्याही व्यक्तीचे, मग तो मुलगा असेल किंवा मुलगी, यांचे लग्न हा सामाजिक चर्चेचा विषय कसा होऊ शकतो हाच प्रश्न आहे. त्यामुळेच आज जरी 'अमुक मुली गायब झाल्या' म्हणून सनसनाटी निर्माण केली जात असली तरी , यातील बहुतांश मुलींचे ठावठिकाणे त्यांच्या पालकांना माहित आहेत, ही बाब मात्र जाणीवपूर्वक लपविली जाते. मुलींनी असे निघून जाणे योग्य आहे असे सरसकट म्हणता येणार नाही हे जितके खरे आहे, तितके मुलींना स्वतःचा 'अवकाश ' मिळवून देण्यात आजची कुटुंब व्यवस्था कमी पडत आहे हे कसे नाकारणार ? आज जग आधुनिक होत आहे, अधिकाधिक जवळ येत आहे . शिक्षणामुळे असेल किंवा आर्थिक सक्षमतेमुळे असेल, मुलींना स्वयंनिर्णयाची ओढ अधिक आहे, आणि त्यानुसार जर त्या वागत असतील तर याला ' आई वडिलांनी काय करायचे ? ' किंवा ' हा सारा लव्ह जिहाद चा परिणाम आहे ' असल्या एकाच छाप्यात कसे बसविता येईल ? कुटुंब व्यवस्था, कौटुंबिक मूल्ये आणि त्याचवेळी प्रत्येक व्यक्तीचा व्यक्ती म्हणून असलेला हक्क , त्याचा स्वतःचा अवकाश या गोष्टी देखील संकून घेणे आवश्यक आहे. सनसनाटी निर्माण करण्यापेक्षा या विषयाकडे मानवी मुल्ल्यांच्या , व्यक्तिगत अधिकाराच्या आणि त्याचवेळी सामाजिक संकेतांची कसरत सावरण्याच्या मानसिकतेच्या अंगाने घ्यायला हवे.