कर्नाटकातील निवडणूक आपण हरणार आहोत भाजपला पूर्व कल्पना आली आहे. म्हणूनच ही निवडणूक आता पुन्हा धार्मीक मुद्यावर वळविण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. बजरंग दलाबद्दल काँग्रेसने केलेल्या वक्त्यानंतर त्याचा संबंध थेट बजरंगबलीशी जोडणे याचा अर्थच भाजपच्या पायाखालची वाळू घसरत आहे हेच कर्नाटकामधून स्पष्ट होत आहे. कर्नाटकचे निकाल देशाला दिशा देणारे ठरणार असल्यानेच देशाचे पंतप्रधान मागिल दोन दिवसापासून कर्नाटकात ठाण मांडून आहे. आणि भाजपमधील अस्वस्थतेचेच हे लक्षण आहे.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. कर्नाटकाला देशाच्या राजकारणात द्रोपची थाळी म्हणून ओळखले जाते. या राज्यातील खनिज संपदा आणि त्यातून होणारी आर्थिक उलाढाल सर्वच राजकीय पक्षांसाठी कायम महत्वाची राहिलेली आहे. म्हणूनच हे राज्य ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची स्पर्धा सुरू असते. भाजप, काँग्रेस, जेडीएस या तीनही पक्षांना कर्नाटकातील सत्ता महत्वाची असते. कारण या राज्यामधून मोठ्या प्रमाणावर आर्थीक हितसंबंध जोपासता येतात. त्यापलिकडे जावून आज देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदींच्या एकाधिकारशाहीविरूद्ध जो आवाज उठविला जात आहे. त्याचेच जनसामान्यांवर काय परिणाम होतात हे देखील कर्नाटकच्या निकालामधून कळणार आहे. म्हणूनच भाजपने या निवडणुकांना विशेष महत्व दिले आहे. भाजपचे अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मात्र कर्नाटकातील जातीय समिकरणे पाहीली तर ज्या जातीय धु्रवीकरणाचा फायदा आजपर्यंत भाजपने उचलला आहे ती जातच आज भाजपसाठी अडचणीची ठरणार आहे. भाजपच्या वयाच्या निकषाने त्यांनी एडीयुरप्पा यांना बाजूला केले, शटार यांना बाजूला केले तेच आता भाजपसाठी अडचणीचे ठरत आहेत. कर्नाटकातील बहूसंख्य असणारा चोक्कलिंगण समाज हा भाजपासोबत नाही. त्याचवेळी काँगे्रसचे नेते असलेले सिद्ध रामय्या हे मात्र प्रदेशात आघाडी घेताना दिसत आहेत. म्हणूनच भाजपने नेहमीप्रमाणे धर्माचे कार्ड खेळले आहे. अन्यथा बजरंगदल आणि बजरंगबली यांचा संबंध जोडण्याचे काहीच कारण नव्हते. बजरंगदलाचे नेते देशात ज्या पद्धतीने भावना भकविण्याचे राजकारण करीत आहेत ते कोणत्याही लोकशाही मानणार्या, संवेदनशिल नागरिकाला पटणारे, पचणारे नक्कीच नाही. तरीही मागच्या चार दिवसातला भाजपचा सारा प्रचार बजरंगबली या एकाच शब्दाभोवती फिरत आहे. भाजपने आपली होणारी परिस्थिती ओळखली आहे. आज कर्नाटकात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. खनिज संपत्तीमधून होणारा भ्रष्टाचार, त्यातून मुठभर लोकांचे साधले जाणारे हित हे देखील महत्वाचे आहे आणि या सर्व बाबींमध्ये भाजपचे लोक बरबटलेले आहेत. आणि त्यामुळेच कर्नाटक राज्य गमविण्याची वेळ भाजपवर येणार आहे. हेच चित्र सर्वत्र दिसत आहे. दहा वर्षापूर्वी ज्यावेळी भाजपने पहिल्यांदा कर्नाटकात विजय मिळविला होता त्यावेळी त्याचे फार कौतुक झाले होते. दक्षिणनेतील राज्यांमध्ये जाण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाल्याचे त्यावेळी सांगितले गेले होते. आता मात्र भाजपचा लोकसभा निवडणुकातील घोडा रोखण्याचे काम सर्वात अगोदर कर्नाटक करेल हे चित्र आहे. आणि म्हणूनच भाजप अस्वस्थ आहे.