आज राज्याच्या राजकारणात ज्या काही घडामोडींचे संकेत मिळत आहेत ते सारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडेल असेच सांगणारे आहेत. मुळात शरद पवारांची सारी राजकीय कारकीर्द बहरली तीच फोडाफोडीच्या राजकारणाने. त्याला त्या त्या वेळी शरद पवारांनी प्रासंगिकतेचा मुलामा दिला असेलही, मात्र केवळ सत्तेसाठीच्या तडजोडीतूनच पवारांचे राजकारण वाढले, फुलले, मात्र पवारांनी राजकारणात आतापर्यंत जे पेरले आता राजकीय उतारवयात तेच त्यांना वेचावे लागेल अशी परिस्थिती आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील तेल लावलेला पैलवान असे ज्यांच्याबद्दल बोलले जायचे त्यांच्या पुतण्यांना सजविण्यासाठी ज्यांना स्वत:च्या पक्षातील फुट रोखता आली नाही, त्या उध्दव ठाकरेंना पुढाकार घ्यावा लागतो, काही वर्ष अगोदर 'हा महाराष्ट्र आहे, गोवा नाही' असे ठणकावणारे शरद पवार स्वत: हतबल असल्याचे सांगतात या पेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा विनोद कोणता असू शकतो? आज शरद पवारांची राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठयावर असल्याचे चित्र आहे, आणि हे सावरण्यात स्वतः शरद पवार कमी पडताहेत हे जे वातावरण निर्माण झाले आहे, त्यापेक्षा वेगळी शोकांतिका ती काय असू शकते?
महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या सुसंस्कृत आहे असे जरी आपण म्हणत असलो तरी या महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया घातला तो तत्कालीन कॉंग्रेसनेच, हे नाकारताच येणार नाही. राज्यातला शेकाप सारखा पक्ष कॉंग्रेसच्या अगदी यशवंतरावांसारख्या नेत्यांनिही फोडला, आणि या फोडाफोडीच्या राजकारणाला तात्विक मुलामे देत, प्रासंगिकतेच्या ढालीआड लपत प्रतिष्ठा दिली ती शरद पवारांनीच. आपल्याच पक्षाची सरकारे पाडण्याचे काम असेल किंवा आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना अस्थिर करण्याचे काम असेल, असले सगळे डाव आजही पवारांच्याच नावाने नोंदविलेले आहेत. त्यामुळे आज जे फोडाफोडीच्या राजकारणाचे पेव फुटलेले आहे, त्याच्या पेरणीसाठी चाडयावरची मुठ शरद पवारांचीच होती हे नाकारता न येणारे सत्य आहे.
राजकारणात शरद पवार कायम धावत्या घोडयावर पैसा लावत आले. आपल्याच पक्षातला एखादा नेता डोईजड होतोय असे वाटल्यानंतर त्याच्या विरोधात पक्षातलीच आघाडी उघडायची हे काम पवारांनी कायम केले . लांबचे सोडा, बीड जिल्ह्याच्या राजकारणात केशरकाकू क्षीरसागर, शिवाजीराव पंडीत, सुंदरराव सोळंके, बाबुराव आडसकर आदी अनेकांना याचा अनुभव आला होता. नंतरच्या काळातही नेत्यांच्या घरात फुट पडेल असे वाटत असताना ते रोखण्याऐवजी त्याला पवार कशी फुस देतात हे राज्याने ठिकठिकाणी अनुभवले आहेच.
राहिला प्रश्न राजकीय विश्वासार्हतेचा, तर याचा आणि पवारांचा संबंधच मुळात कधी आलेला नव्हता. पवारांचा पुलोदचा प्रयोग असेल किंवा आणखी कोणत्याही भूमिका, पवार कोणासोबतही जाऊ शकतात हेच त्यांच्याबाबतचे त्यांनीच सिध्द केलेले गृहीतक आहे. त्यामुळेच आता त्यांनीच जे डाव पेरले, ते वेचण्याची वेळ त्यांच्या पक्षावर येत आहे का? असे वाटावे अशी परिस्थिती आज राज्यात आहे. जी राष्ट्रवादी मुळात स्थापनच फुटीतून झाली ती आज फुटीच्या उंबरठयावर आहे.