ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. यासोबतच हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी लाखो अनुयायांनी उपस्थिती लावली होती.
ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्मश्री किताबाने सन्मानित डॉक्टर श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा इथल्या त्यांच्या निवास्स्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्रच्या माध्यमातून समाज घडवण्याचं कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदीर्घ काळापासून करत आहेत. त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांनी हा वारसा घेतला. श्रवण बैठकांच्या माध्यमातून अध्यात्म आणि समाज परिवर्तनाचं कार्य त्यांच्याकडून गेली आठ दशकं सुरू आहे. 2019 मध्ये एबीपी माझानंही 'माझा सन्मान' देऊन आप्पासाहेबांना सन्मानित केलं होतं. आज महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं