Advertisement

हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त आता 'या' 13 भाषांमध्ये देता येणार CRPF परीक्षा

प्रजापत्र | Saturday, 15/04/2023
बातमी शेअर करा

नवी दिल्ली - गृह मंत्रालयानं केंद्रीय निमलष्करी दलात भरतीसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली आहे.

CAPF मध्ये स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या पुढाकारानं हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय.

त्यामुळं आता CRPF भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी भाषेत सेट केली जाणार आहे.

गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळं लाखो उमेदवारांना त्यांच्या मातृभाषा/प्रादेशिक भाषेतून परीक्षेत भाग घेता येणार आहे. त्यामुळं त्यांची निवड होण्याची शक्यता वाढणार आहे. कॉन्स्टेबल परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे आयोजित प्रमुख परीक्षांपैकी एक आहे. यामध्ये देशभरातून लाखो उमेदवार भाग घेतात.

हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 1 जानेवारी 2024 पासून 13 प्रादेशिक भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. गृह मंत्रालयानं सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालय प्रादेशिक भाषांचा वापर आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) भरती परीक्षा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचं आवाहन केलं होतं.

Advertisement

Advertisement