बाबासाहेबांनी दिलेला समतेचा विचार हा केवळ सामाजिक समतेपुरता मर्यादित नव्हता, तर सामाजिक समतेसोबतच राजकीय,आर्थिक समता देखील अपेक्षित होती.बाबासाहेबांनी ज्यावेळी त्यांच्या अनुयायांना 'राज्यकर्ती जमात ' होण्याचा सल्ला दिला होता, त्यावेळी त्यांना केवळ मूठभर लोकांनी सत्तेच्या खुर्चीवर बसावे असे अपेक्षित नव्हते तर,आंबेडकरी समूहाच्या मान्यतेशिवाय कोणतीही धोरणे आणता येणार नाहीत,इतका सामाजिक दबाव या विचारधारेने (कोणा एका जातीसमूहाने नाही) निर्माण करावा असे अपेक्षित होते.आजच्या व्यक्तिनिष्ठ राजकारणाच्या महिमामंडनाच्या वातावरणात आम्हाला बाबासाहेबांचे विचार म्हणूनच आवश्यक आहेत. जयंतीच्या दिवशी केवळ अभिवादन करून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करता येणार नाही, तर बाबासाहेब आपल्या रोजच्या जगण्यात आले पाहिजेत,म्हणजेच त्यांच्या विचारांच्या सूत्रात आपले रोजचे जगणे असायला हवे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. बाबासाहेबांची जयंती हा साहजिकच सर्वांच्याच अस्मितेचा आणि उत्साहाचा विषय असतो. तो असेलही पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्या समजलं जे दिले आहे, त्याची तुलना होऊच शकत नाही. याठिकाणी समाज हा शब्द वापरताना आम्हाला संपूर्ण मानव समाज असे म्हणायचे आहे, या ठिकाणी समाज म्हणजे कोना एका जातिसमूहापुरती मर्यादित संकल्पना मांडायची नाही. कारण बाबासाहेबानी जे काम उभा केले, तते सर्वच समाजघटकांसाठी होते. बाबासाहेब जितके दलितांसाठी होते , त्यापेक्षा कितीतरी अधिक ते दलितेतरांसाठी होते. समाजातले जे जे म्हणून कोणी उपेक्षित आहेत, त्या सर्वांसाठी उद्धारकर्त्याची भूमिका बाबासाहेबांनी निभावली आहे.
स्वातंत्र्यानंतर संविधानाच्या माध्यमातून असेल किंवा स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी केलेल्या वेगवेळ्या आंदोलनांच्या माध्यमातून असेल, त्यांनी जो लढा उभारला, जी आंदोलने केली, जे शोधनिबंध लिहिले, जी वृत्तपत्रे सुरु केली , त्या सर्वांचा केंद्रबिंदू उपेक्षित , सामाजिकदृष्ट्या गुलामीत असलेला, नाहीरे वर्गच होता. आणि म्हणूनच आजही या वर्गाचे म्हणून जे कोणी आहेत, त्यांना आपल्या उद्धारासाठी बाबासाहेबांच्याच विचारांकडे जावे लागणार आहे.
बाबासाहेबानी जो राज्यकर्ती जमात होण्याचा सल्ला दिला होता, त्यानुसार काम करण्याची जबाबदारी आज बाबासाहेबांच्या वैचारिक वारासदारांवर मोठी आहे. राज्यकर्ती जमात होणे म्हणजे केवळ चार दोन ठिकाणी आपल्या जातीची माणसे निवडणून येणे असा नाही. तर बाबासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या समूहाची राजकीय शक्ती इतकी निर्माण व्हायला हवी, या समूहाचा दबावगट इतका सक्षम असायला हवा की , या वर्गाला मारक असणारी धोरणेच यायला नकोत . म्हणूनच मग शेतकरी , कामगार किंवा आणखी कोणतेही घटक त्यांनी बाबासाहेबांच्याच विचाराने राज्यकर्ती जमात होण्यासाठी पावले उचलणे म्हणजे खऱ्याअर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करणे आहे.आज बार्टीमधून सरसकट फेलोशिप मिळावी यासाठी अआंदोलने करावी लागत असतील, जेंडर बजेट नावाचा प्रकारचं अस्तित्वात नसेल, सामाजिक न्यायाच्या योजनांना सरळ सरळ कात्री लावली जात असेल तर आर्थिक समता कशी येईल ? याचाही विचार करणे आवश्यक आहे. जे आर्थिक समतेचे , तेच राजकीय आणि सामाजिक, शैक्षणिक समतेचे आहे. आज राजकारणात एकाधिकारशाहीचे चित्र आहे. आणि स्वतःला बाबासाहेबांचा विचार घेऊन चालतो असे सांगणारे काही क्लॉक जर त्या एकाधिकारशाहीच्या पालखीचे ओझे वाहून नेण्यातच धन्यता मानणार असतील , तर बाबासाहेबांना अपेक्षित समाजरचना होणार कशी ? सांस्कृतिक विविधता असणाऱ्या देशावर एकच संस्कृती थोपविण्याचा प्रयत्न होत असेल, शिक्षणातून सामान्य, गरीब वर्ग हद्दपार होईल अशीच धोरणे राबविली जात असतील आणि अशावेळी नाहीरे वर्ग गप्प असणार असेल, तर बाबासाहेबाना अपेक्षित समाज मुळात शिल्लकच राहणार नाही. म्हणूनच आज जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांनी सांगितलेला 'मूकनायक' आपल्या मनामध्ये जागृत करून ' बहिष्कृत भारत ' मुख्य प्रवाहामध्ये आणून 'जनता ' सुखी करणारी 'समता ' आणायची असेल तर आपल्या जगण्याचे सूत्र म्हणून बाबासाहेबांकडे पाहावे लागेल, नव्हे बाबासाहेब रोजच्या जगण्या वागण्यात जगावे लागतील. त्यांचे विचार केवळ डोक्यावर नव्हे तर डोक्यात घेऊन वाटचाल करावी लागेल. आज ते करण्यासाठी आपण कटीबद्द होऊयात, हेच आपले बाबासाहेबांना अभिवादन असेल.