बीड - ऊसतोड मजुरांचा जिल्हा आता MPSC च्या माध्यमातून अधिकाऱ्यांचा जिल्हा ठरत आहे. संतोष खाडे, सोनाली मात्रे यांच्या नंतर शेख सीमा आणि सय्यद हुनैन या दोन लेकींनी अधिकारी होऊन जिल्ह्याची मान उंचावली आहे. सीमा यातर मुलींमध्ये प्रथम आल्या असून, सय्यद हुनैन यांनी घरीच अभ्यास करत अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले. या यशाबद्दल दोन्ही लेकींवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
मराठवाडा अन् त्यातील बीड म्हटलं की, विकासात सर्वात मागे अन् राजकारणात सर्वात पुढे म्हणून बीडला ओळखलं जातं. पण आता MPSC टॉपरांचा जिल्हा म्हणूनही बीड पुढे येत आहे. हे काम प्रथम सोनाली मात्रे ही राज्यात मुलीतून पहिली आली. या पाठोपाठ संतोष खाडे हा ओबीसी मधून पहिला आला तर मार्च अखेरीस वनपरिक्षेत्र अधिकारी वर्ग १ चे निकाल आले त्यात गेवराई तालुक्यातील शेख सीमा अजिज ( रा. मादळमोही ) ही राज्यात मुलीतून पहिली आली. हे यश जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून परत शेख सीमा यांनी यशाची गगनभरारी घेऊन बीड जिल्ह्याची मान उंचावत वनपरिक्षेत्र अधिकारी वर्ग १ पदी विराजमान होऊन स्वप्न साकार केले. तसेच बीड जिल्ह्याची दुसरी लेक सय्यद हुनैन बतुल कलीम अहेमद हीने ही केवळ जिद्द व चिकाटीच्या जोरावर कोणतेही क्लास न लावता तसेच बाहेर कुठेही न रहाता घरीच अभ्यास करुन MPSC सर करत आयबीपीएस ॲग्रीकल्चर स्पेशालिस्ट ऑफिसर स्केल – १ ( कृषी अधिकारी वर्ग -१ ) पदी निवड झाली. घरी अभ्यास करुन स्पर्धा परीक्षा सर करण ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे या दोन्ही लेकीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.