Advertisement

पुणे : MPSC आंदोलक आणि पोलिसांमधला तणाव वाढला

प्रजापत्र | Saturday, 10/10/2026
बातमी शेअर करा

पुणे : पुण्यातील अलका टॉकीज चौक आणि एस. एम. जोशी पूल परिसरात गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता वेगळे वळण लागले आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या १५ जणांवर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करून विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे पदाधिकारी शिवराज मोरे यांच्यासह ५ जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे प्रशासन आणि आंदोलक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधींनी आंदोलन मागे घेत असल्याचे लेखी पत्र दिले होते. मात्र, तरीही पूर्वकल्पना न देता अचानक एस. एम. जोशी पुलावर रस्ता रोको करून सार्वजनिक वाहतूक ठप्प करण्यात आली. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने १५ प्रमुख आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याव्यतिरिक्त, शहरातील संवेदनशील भागात कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ड्रोनद्वारे चित्रीकरण करणे हे सुरक्षेचे उल्लंघन असल्याने ५ जणांवर स्वतंत्र एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

 

दुसरीकडे, आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आणि उपोषणाच्या माध्यमातून लढा देत आहोत. मात्र, गुन्हे दाखल करून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, अशी भावना विद्यार्थी व्यक्त करत आहेत. या कारवाईवरून राजकीय वातावरणही तापले असून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असताना, मुख्य दोषींवर कारवाई करण्याऐवजी आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवरच गुन्हे दाखल करणे अन्यायकारक आहे," असे वडेट्टीवार म्हणाले. त्यांनी हे सर्व गुन्हे तातडीने मागे घेण्याची आणि MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

 

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल झाल्याने या आंदोलनाला आता राजकीय रंगही चढला आहे. एकीकडे विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि दुसरीकडे पोलिसांची कायदा व सुव्यवस्था राखण्याची भूमिका, यामुळे पुण्यातील वातावरण तणावपूर्ण झाले असून यावर शासन काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement