पुन्हा एकदा कोरोनाच्या (Covid-19) वाढत्या रुग्णसंख्येनं धाकधूक वाढवली आहे. देशात कोरोनाचा संसर्ग दुप्पट वेगानं वाढत आहे. गेल्या आठवडाभरात नव्या रुग्णांची संख्या आता दुप्पट झाली आहे. आज म्हणजेच, गुरुवारी देशात 3,095 कोरोना बाधितांची (Coronavirus) नोंद करण्यात आली आहे. आज सलग दुसरा दिवस आहे, जेव्हा एका दिवसात नव्या रुग्णांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये गोवा-गुजरातमधील प्रत्येकी एक आणि केरळमधील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 5.30 लाख लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 2.61 टक्के नोंदवण्यात आला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 1.91 टक्के नोंदवण्यात आला आहे. देशात कोरोनाचे एकूण 4.47 कोटी रुग्ण आहेत.
गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात तीन हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. जे गेल्या सहा महिन्यांत पहिल्यांदाच घडलं आहे. गेल्या आठवड्यापर्यंत देशात दररोज सरासरी 1,500 लोकांना कोरोना संसर्ग होत होता. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात कोरोना व्हायरसच्या 3,016 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 2 ऑक्टोबर 2022 रोजी कोरोनाचे 3,375 रुग्ण आढळले होते. याशिवाय 1,396 रुग्ण कोरोमुक्त झाले आहेत. बुधवारी सक्रिय रुग्णांची संख्या 13,509 इतकी होती, जी आता 15,208 वर पोहोचली आहे.