Advertisement

पीएनबी घोटाळ्यात बीड जिह्यातील शिवपार्वती कारखान्यावर सीबीआयची छापेमारी

प्रजापत्र | Thursday, 30/03/2023
बातमी शेअर करा

बीड दि. ३० (प्रतिनिधी ) : देशात गाजलेल्या पीएनबी (पंजाब नॅशनल बँक ) घोटाळ्याची धागेदोरे बीडपर्यंत पोहचले असून याच संदर्भाने सीबीआयने बुधवारी रात्री आणि गुरुवारी बीड जिल्ह्यातील मुंगी (ता. धारूर ) येथील शिवपार्वती साखर कारखान्यावर छापेमारी केली आहे. यातून काय माहिती समोर आली हे स्पष्ट नसले तरी यामुळे जिल्ह्यात मात्र काही काळ खळबळ माजली होती. 
बीड जिल्ह्यातील एका साखर कारखान्यावर सीबीआयची छापेमारी सुरु असल्याच्या वृत्ताने जिल्ह्यात खळबळ माजली होती. तो कारखाना कोणता आणि छापेमारीचे  कारण काय यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावणे सुरु असतानाच आता या छापेमारीचे मूळ पीएनबी घोटाळ्यात असल्याचे समोर आले आहे. पीएनबी घोटाळ्यात दाखल गुन्ह्याचा तपास सध्या सीबीआय करीत आहे. 
पंजाब नॅशनल बँकेने बीड जिल्ह्यातील मुंगी (ता.धारूर ) येथील शिवपार्वती साखर कारखान्याला कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले होते. पुरेसे तारण नसतानाही सदर की कर्ज देण्यात आल्याचा आरोप असून त्याचअनुषंगाने सीबीआयने बुधवारी आणि गुरुवारी कारखाना साईटवर छापेमारी करून माहिती घेतल्याचे समजते. 

---
काय शिवपार्वती कारखान्याचे प्रकरण ? 
शिवपार्वती साखर कारखान्याची उभारणी पांडुरंग सोळंके यांच्या पुढाकारातून करण्यात आली. यात इतरही काही भागीदार आणि संचालक होते.या कारखान्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने कर्ज दिले, मात्र नंतरच्या काळात कारखाना सुरु होऊ शकला नाही. त्यामुळे पंजाब नॅशनल बँक आणि कारखान्याच्या संचालकांनी देखील सदर कारखाना विकण्याचे प्रयत्न केले होते. मराठवाड्यातील अनेक राजकीय पक्षांच्या लोकांनी यात इंट्रेस दाखविला होता, मात्र वेगवेगळ्या न्यायालयीन दाव्यांमुळे ही विक्री प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यातच काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने सदर कारखान्याची लिलाव प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले होते. याची पुढील सुनावणी ३ एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान हे सारे होत असतानाच पंजाब नॅशनल बँकेवर गुन्हा दाखल होऊन त्याचा तपास सीबीआयकडे गेला आणि त्यातूनच मग ही छापेमारी  झाल्याचे समोर येत आहे. 

---

Advertisement

Advertisement