Advertisement

कोठेही तोंड मारल्याने झाले 'अजीर्ण',फटका बसताच दीड महिन्यांपासून अधिकारी गायब

प्रजापत्र | Saturday, 18/02/2023
बातमी शेअर करा

बीड : लोकांच्या 'अन्ना'ची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तींना 'प्रशासना'त काम करताना प्रत्येक ठिकाणी चरण्याची सवय लागली की नावात 'गाय ' असूनही कधीतरी 'अजीर्ण ' होतेच . आणि एकदा का 'अजीर्ण ' झाले की मग सक्तीने वमन करणे आलेच. मात्र एका अधिकाऱ्याच्या बाबतीत व्यापाऱ्यांनीच त्याला खाल्लेले 'वमन ' करायला भाग पाडले आणि त्याचा धोसरा या अधिकाऱ्याने इतका घेतला , कि मागच्या दिड महिन्यापासून हा अधिकारी कोठे आहे हे त्याच्या 'खात्या 'लाही माहित नाही.

 


 

जनतेच्या रोजच्या अन्नात भेसळ होऊ नये यासाठी राज्यसरकार अधिकारी नेमते. मात्र अधिकाऱ्याच्या मानसिकतेतच लाचेची 'भेसळ ' घुसली आणि कोठूनही नमुने गोळा करण्याच्या नावाखाली चरायला सुरुवात झाली की मग त्याचे कधीतरी अजीर्ण होणारच. लोक तरी किती दिवस सहन करणार , 'महेंद्र पर्वता ' सारखे प्रचंड अधिकार त्या अधिकाऱ्याला असतीलही, पण लोकांची  सहन करण्याची मर्यादा कधीतरी संपते , आणि व्यापाऱ्यांमधला अ 'संतोष' कोणत्या रूपाने प्रकट होईल हे सांगता येत नाही. काही दिवसापूर्वी बीडमधील एका अधिकाऱ्याला या अ 'संतोषा'चा प्रसाद मिळाल्याची चर्चा सध्या व्यापाऱ्यांमध्ये जोरात आहे. इथे तिथे तोंड मारण्याची सवयच लागलेल्या या अधिकाऱ्याने एका ठिकाणी मनसोक्त 'चरल्या' नंतर पुन्हा व्यापाऱ्यांचाच उद्धार केला आणि त्यामुळे चिडलेल्या व्यापाऱ्यांनी आपल्या नेत्याला हे सांगितल्यानंतर त्या अधिकाऱ्याला चांगलाच 'धडा ' एका मंगलकार्यालयात मिळाल्याची माहिती आहे. त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी आतापर्यंत खाल्लेले तर ओकावे लागलेच , पण त्यासोबतच अधिकच 'प्रसाद ' देखील मिळाला . अखेर त्याच्या खात्याच्या वरिष्ठांनीच खात्याची अब्रू जाऊ नये म्हणून त्याची सुटका करविली . तेव्हापासून सदर अधिकारी बीडमधून गायब आहे. तो अधिकारी कोठे आहे हे कोणालाच माहित नाही , पण या अ'संतोषा 'च्या प्रसादाची चर्चा व्यापाऱ्यांमध्ये जोरात आहे.  

Advertisement

Advertisement