Advertisement

तर भाजपातही जाऊ प्रकाश सोळंकेंच्या विधानाने राजकारणात खळबळ

प्रजापत्र | Monday, 13/02/2023
बातमी शेअर करा

माजलगाव :- सत्ता बदलानंतर माजलगावचे आ. प्रकाश सोळंके हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा मागील आठ महिन्यापासून सुरू आहे. याबाबत बोलताना आ. सोळंके म्हणाले की , या चर्चेबाबत मला माहिती नाही परंतु मतदारसंघातील जनतेची इच्छा असेल तर भाजपातही जाऊ शकतो असे प्रतिपादन एका पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार सोळंके यांनी आपले मत व्यक्त केले. यामुळे राजकारणात खळबळ माजली आहे. 
      माजलगाव मतदार संघाचे आ. प्रकाश सोळंके हे दोन वेळा भाजपकडून तर दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस कडून आमदार झाले. तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीची सत्ता आली तेव्हा आ. सोळंके यांनी मंत्रीपदाची मागणी केली होती. त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची धमकी देखील दिली होती.
मागील 8-9 महिन्यांपूर्वी सत्ता बदल झाल्यानंतर आ. सोळंके हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा वारंवार होत होती. ते अनेक वेळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्कात असल्याचे देखील चर्चा रंगू लागली होती. 
येथील सुंदरराव सोळुंके महाविद्यालयात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत राष्ट्रवादीकडून 17 फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते यावेळी म्हणाले की , मी भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असल्याची मला अद्याप माहिती नसून जर जनतेची इच्छा असेल तर त्यांच्याशी चर्चा करून ते करावेही लागेल. परंतु भाजपाचे काही लोक याच्या वावड्या उठवतांना  दिसत आहेत.
----

सर्व पर्याय खुले 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या चांगले काम सुरु असुन त्यांना बीड जिल्ह्यात मजबूत नेत्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गरज पडल्यास त्यांच्या पक्षात देखील प्रवेश शक्य असुन सद्यस्थितीत विविध पक्षाचे पर्याय  सर्व पर्याय खुले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी तेलंगणा मधील केसीआर सरकारच्या चांगल्या कामाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
 

Advertisement

Advertisement