Advertisement

7.8 तीव्रतेचा भूकंप, 4 देशांमध्ये विध्वंस

प्रजापत्र | Monday, 06/02/2023
बातमी शेअर करा

मध्यपूर्वेतील चार देश तुर्किये (जुने नाव तुर्की), सीरिया, लेबनॉन आणि इस्रायल सोमवारी सकाळी भूकंपाने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या तुर्किये आणि त्याच्या जवळील सीरियाच्या भागात सर्वाधिक विध्वंस पाहायला मिळत आहे. तुर्कीमध्ये आतापर्यंत 284 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 440 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी सीरियामध्ये 237 लोक मारले गेले तर 639 जखमी झाले. लेबनॉन आणि इस्रायलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले, परंतु येथे कोणतेही नुकसान झाले नाही.

भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कियेमधील गझियानटेप शहर होते. हे सीरिया सीमेपासून 90 किमी दूर आहे. त्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या भागात अधिक विध्वंस झाला. त्याचा परिणामही दिसून येत आहे. दमास्कस, अलेप्पो, हमा, लताकियासह अनेक शहरांमध्ये इमारती कोसळल्याचं वृत्त आहे.

18 आफ्टरशॉक आले, 7 तीव्रतेचे 5 पेक्षा जास्त
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, 7.8 तीव्रतेच्या भूकंपानंतर 18 आफ्टरशॉक नोंदवले गेले. त्यांची तीव्रता 4 पेक्षा जास्त होती. पहिल्या भूकंपानंतर झालेल्या 7 मोठ्या भूकंपांच्या धक्क्यांची तीव्रता 5 पेक्षा जास्त होती. पुढील काही तास आणि दिवस आफ्टरशॉक जाणवतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सलग 3 भूकंप

युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, पहिल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कहरामनमारस प्रांतातील गझियाटेप शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आणि जमिनीपासून सुमारे 24 किलोमीटर खाली होता. स्थानिक वेळेनुसार पहाटे 4.17 वाजता हा भूकंप झाला. 11 मिनिटांनंतर 6.7 रिश्टर स्केलचा दुसराही भूकंप झाला. त्याचे केंद्र जमिनीपासून ९.९ किलोमीटर खाली होते. दुसऱ्या भूकंपानंतर १९ मिनिटांनी ५.६ रिश्टर स्केलचा तिसराही भूकंप झाला. त्यामुळे अनेकांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

सर्वाधिक प्रभावित शहरे:
अंकारा, गझियानटेप, कहरामनमारा, दियारबाकीर, मालत्या, नुरदगी शहरासह 10 शहरे मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. येथे 250 हून अधिक इमारती कोसळल्याचं वृत्त आहे. अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. अनेक भागात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

100 वर्षांनंतर असा भूकंप, 10 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो
दुसरीकडे, युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) ने धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार, 'तुर्कीयेमध्ये मृतांची संख्या एक हजारावर पोहोचली आहे. ही संख्या 10 हजारांपर्यंत पोहोचू शकते.

USGS ने यामागे असा तर्क केला की, 1939 मध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तेव्हा 30 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी, 1999 मध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता, ज्यामध्ये 845 लोकांचा मृत्यू झाला होता.

नोव्हेंबरमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता
तुर्कियेमध्ये नोव्हेंबर महिन्यात 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्याचे धक्के इतके जोरदार होते की राजधानी अंकारा, इस्तंबूल आणि आसपासच्या परिसरात जाणवले. आरोग्य मंत्री फहरतीन कोका म्हणाले - 22 जण जखमी झाले होते. भूकंपाच्या भीतीने या लोकांनी उंच इमारतीवरून उद्या मारल्या.

1999 मध्ये झालेल्या भूकंपात 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता
न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू दुजसे प्रांतातील गोलकाया येथे होता. हे शहर इस्तंबूलपासून 200 किलोमीटर अंतरावर आहे. याच शहरात १९९९ मध्ये ७.२ रिश्टर स्केलचा सर्वात धोकादायक भूकंप झाला होता, ज्यामध्ये ८४५ लोकांचा मृत्यू झाला होता.

Advertisement

Advertisement