जामखेड - जामखेड पोलीस स्टेशनला दाखल मिसिंग गुन्ह्याचा तपास करत असताना एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे बालविवाह व अपहरणाचा. यामुळे सदर अत्याचारीत अल्पवयीन बालीका हीचे आई वडील, मामा-मामी, पती सह अनेक जणांवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर अत्याचारीत बालीका ही अल्पवयीन असल्याने सदर गुन्ह्याची फिर्याद पोलीस हेडकॉन्टेबल संजय भाऊसाहेब लाटे यांनी दिली आहे. तसेच आपल्या आजूबाजूला असे प्रकारच होत असतील तर पोलीसांना कळवावेत पोलीस तुमच्या पाठीशी राहतील असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे.
पोलिसांन कडुन मिळालेली सविस्तर माहिती आशी की जामखेड नगरपरिषद हद्दीतील धोत्री येथील अक्षय लक्ष्मण साळुंके (वय २७) यांने दि. १८ जानेवारी रोजी जामखेड पोलीस स्टेशनला अशी खबर दिली की, ” माझी पत्नी हि दिनांक १८/०१/२०२३ रोजी सकाळी गावातील दवाखान्यात जाते असे सांगुन राहते घरातून निघुन गेली. परंतु ती परत न आल्याने तिचा शोध घेतला असता ती मिळून झालेली नाही. ” त्यानुसार जामखेड पोलीस स्टेशनला मनुष्य मिसिंग रजि. क्रमांक ०२/२०२३ प्रमाणे नोंद करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल संजय लाटे हे चौकशी करत असताना चौकशी दरम्यान साक्षीदारांचे जबाब नोंदवून तसेच सदर मिसिंग महिलेच्या जन्मतारखे बाबतची कागदपत्रे तपासणी करताना अत्यंत धक्कादायक अशा बाबी निष्पन्न झाल्या की, नमुद मिसिंग झालेली विवाहिता हिचे वय लग्नाचे वेळी फक्त १५ वर्ष होते. तसेच ती अल्पवयीन (बालक) आहे. याची पुर्णतः माहिती व जाणिव असताना या गुन्ह्यातील आरोपी तिचे मामा युवराज पांडुरंग रेडे, मामी अश्विनी युवराज रेडे, आई-अलका संभाजी शिंदे, वडील-संभाजी शहाजी शिंदे, सासरे लक्ष्मण सूर्यभान साळुंके, सासु सुनिता लक्ष्मण साळुंके, दिर-अविनाश लक्ष्मण साळुंके या सर्वांनी सदर अल्पवयीन पिडीतेशी अक्षय लक्ष्मण साळुंके (वय २७ वर्षे) याचेशी तिचे लग्न जमवून, लग्न लावण्यास परवानगी देवून तिचे लग्नात समक्ष उपस्थित राहून लग्न करून दिलेले आहे.
त्याच प्रमाणे सज्ञान इसम नामे अक्षय लक्ष्मण साळुंके,वय-२७ वर्षे याने सदर पिडीता हि अल्पवयीन (बालक) आहे याची पुर्णतः माहिती च जाणिव असताना तिचेशी विधीवत लग्न केलेले आहे. चौकशीअंती असे देखील निष्पन्न झालेले आहे की, नमुद मिसिंग अल्पवयीन महिला हि तिचे सासरी नांदत असताना तसेच ती १६ वर्षांची व अल्पवयीन (बालक) आहे याची पुर्णतः माहिती व जाणिव असताना आरोपी नामे विकास बबन खांडवे, रा. कऱ्हेवडगाव ता. आष्टी, जि.बीड याने दि. १८/०१/२०२३ रोजीचे सकाळी १०: ३० वाजताचे सुमारास तिस काहीतरी फुस लावुन, कोणत्यातरी कारणासाठी तिचे कायदेशीर रखवालीतून अपहरण केले आहे.. सदरचे प्रकरणात चौकशीअंती निष्पन्न झालेल्या बाबी वरून जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्टेबल संजय लाटे यांनी स्वतः फिर्यादी होवुन या आरोपी विरुद्ध गुन्हा रजि नं. २८/२०२३ बाल-विवाह प्रतिबंधक अधिनियम-२००६ चे कलम ९, १० व ११ प्रमाणे तसेच भा.द.वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याचा प्रकार हा सामाजिक स्वरुपाचा व अत्यंत गंभीर प्रकारचा असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीसउप-निरीक्षक संपत कन्हरे हे करीत आहेत.
प्रजापत्र | Wednesday, 25/01/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा