देशभरातील आयआयटी किंवा वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठीची पंढरी म्हणून ज्याकडे पाहिले जाते त्या कोटामध्ये एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. चालू वर्षी कोटा गावात चौदा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. अर्थात कोरोनाची दोन वर्षे वगळली तर प्रत्येक वर्षी 15-20 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कोटा शहराला नवीन राहिलेल्या नाहीत. पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली गळेकापू स्पर्धेत होणारी कुतरओढ सहन करता येत नाही म्हणून विद्यार्थ्यांना जीव द्यावा लागत असेल तर आपण आपल्या पाल्यांना कोणत्या संकटात ढकलत आहोत याचा विचार करण्याची ही वेळ आहे.
राजस्थानातील कोटा हे गाव सध्या आयआयटी आणि नीटसाठी हमखास यशाचे केंद्र म्हणून पुढे येत आहे. किंबहुना तसे भासविले जात आहे. कोट्यामध्ये प्रवेश घेणारा प्रत्येक विद्यार्थी आयआयटीला किंवा नीटला जातोच असे नाही मात्र आयआयटीला लागणारे कोट्यामधलेच असतात असे भासविले जरूर जाते. त्यामुळेच कोट्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी देशभरातील विद्यार्थ्यांची मारामार असते. देशभरात आयआयटीच्या सुमारे 16 हजार जागा आहेत. तर एकट्या कोटा शहरात यासाठी तयारी करणार्या विद्यार्थ्यांची संख्या लाखापेक्षा अधिक आहे हे लक्षात घेतले की मग कोट्याचे महत्त्व लक्षात येते.
अशा या शिक्षण पंढरीम्हणून समोर येऊ लागलेल्या गावात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ येते हा विषय सामुहिक चिंतनाचा आहे. सोमवारी एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि त्यानंतर त्या भागातील आमदारांनी जिल्हाधिकार्यांना पत्र लिहून येथील स्पर्धेबद्दल केलेली विचारणा यामुळे या सार्याच प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. आजचे युग स्पर्धेचे आहे हे मान्यच करावे लागेल. त्याबाबत दुमत असल्याचे काहीच कारण नाही. पूर्वी चार दोन टक्क्यांची स्पर्धा असायची. आता ही स्पर्धा काही अंशांमध्ये आलेली आहे. आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी ऊर फुटेस्तोर धावणे हेच प्रत्येकाला आयुष्याचे इती कर्तव्य वाटत आहे. कोट्यामध्ये शिक्षणासाठी आपल्या पाल्याला पाठविण्यासाठी लागेल ती पदरमोड करण्याची आणि प्रसंगी पोटाला चिमटा घेण्याची तयारी पालकांची असते. आणि मग पालकांच्या या त्यागाचे ओझे घेवून ज्यावेळी विद्यार्थी या संपूर्ण अनोळखी जगात प्रवेश करतो त्यावेळी तिथली स्पर्धा अनेकदा या विद्यार्थ्यांना हतोत्साहीत करते. अगदी एखाद्या दिवशी एखादा विद्यार्थी एखादा तास उशीरापर्यंत झोपला तरी जणू काही आता जग बुडाले असे वातावरण त्या परिसरात केलेले आहे. कोट्यामध्ये विद्यार्थ्यांना पाठविल्यानंतर पालकांच्या अपेक्षांचे फार मोठे ओझे घेवून हे विद्यार्थी आयुष्यातील दोन तीन वर्ष तेथे घालीत असतात. आणि त्यातूनच मग या जीवघेण्या स्पर्धेत आपण टिकू की नाही या भीतीच्या सावटाखाली अनेक विद्यार्थी असतात त्यातूनच काहीजण थेट आयुष्यच संपवितात. मागच्या पाच सहा वर्षातील घटनाक्रम पाहिला तर कोरोनामुळे जग थांबलेली दोन वर्ष वगळली तर दर वर्षी कोटा शहरात 15-20 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. एक तर हे विद्यार्थी देशाच्या वेगवेगळ्या कोपर्यातून आलेले असतात. त्यामुळे एकदा का त्या पालकांच्या हातात त्या विद्यार्थ्याचे शव दिले की मग या आत्महत्येची पुन्हा कोणी चर्चा करीत नाही. परंतु पालकांच्या अपेक्षेच्या ओझ्याखाली भावी पिढीला आपण कोणत्या मार्गावर ढकलत आहोत याचा विचार करणे आता काळाची गरज आहे. कोटा मध्ये कोचिंग क्लासेस ही फार मोठी इंडस्ट्री आहे. दरवर्षी अब्जावधी रूपयांची उलाढाल या ठिकाणी होते. त्यामुळे येथे एक प्रकारच्या वेगळ्या स्पर्धेचे वातावरण कायम तयार केलेले असते. जगण्यासाठी, प्रगतीसाठी स्पर्धा आवश्यक असतेच पण ही स्पर्धा इतकी गळेकापू व्हावी की परतण्याचे दोरच शिल्लक राहू नयेत असे वातावरण देखील उपयोगाचे नसते. पालकांपासयून दूर संपूर्ण अनोळखी प्रदेशात जिथे आपली काळजी घेणारे कोणीच नाही आणि शेजारचा विद्यार्थी देखील आपल्याशी बोलण्यात तास अर्धातास घालविण्याची सूतराम शक्यता नाही. अशा वातावरणात अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जागा उरत नाही. आणि मग त्याला आयुष्य संपविणे हाच एक पर्याय वाटत असेल तर आम्ही समाजाला नेमकी कोणती स्पर्धा देत आहोत याचा विचार आज ना उद्या करावा लागणार आहे.
विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्यांचे भवितव्या, पालकांच्या अपेक्षा, करिअरवाली झालेली व्यवस्था या सार्या वास्तवाचे भान ठेवून देखील समाजाने, पालकांनीही पाल्यांवर किती ओझे टाकायचे आणि ते ओझे टाकण्या अगोदर त्याचे खांदे मजबूत आहे का नाही हे तरी पाहण्याचे भान ठेवणे देखील आवश्यक आहे. महाराष्ट्रातूनही अगदी मराठवाड्यातूनही दरवर्षी कोटा येथे जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र कोटा शहराचे आणि तिथल्या स्पर्धेचे हे वेगळे रूप आपल्या भागातील किती पालकांना माहित आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या पाल्यांनी मोठे होण्याची स्वप्ने पाहणे पालकांसाठी आनंददायी असतेच मात्र त्याला ज्या स्पर्धेत ढकले जात आहे त्या स्पर्धेसाठी त्याला निकोप वातावरण देणे देखील पालकांचीच जबाबदारी असते याचीही जाण ठेवली जाणे आवश्यक आहे. अन्यथा विनाकारण एखाद्या शहराकडे जाणारे लोंढे आणि त्यातून अपेक्षाभंगाचे दु:ख, किंबहुन त्या पलिकडे जाऊन पचविता न येणार्या दु:खाला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये याचा विचार पालकांनीही करणे आवश्यक आहे.