अशोक शिंदे
नेकनूर- दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणाऱ्या तरुणीवर अॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना येळंबघाट ( ता. बीड ) येथे घडली. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना रविवारी पहाटे तिचा मृत्यु झाला.याप्रकरणी आरोपी अविनाश राजुरेला देगलूर येथून अटक करण्यात आली आहे.
बीड तालुक्यातील येळंबघाट येथे शनिवारी रस्त्यालगत २२ वर्षीय तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली. शेळगाव ( ता.देगलूर जि. नांदेड ) येथील तरुणी गावातीलच एका तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दि.१३ नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास येळंबघाट (ता.बीड ) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा – केज मुख्य रस्त्यावरून जात असताना तरुणाने दुचाकी थांबवली. तरुणीला रस्त्याच्या कडेला घेऊन तिच्यावर तरुणाने अॅसिड टाकले. त्यांनतर काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले.तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. अॅसिड हल्ला आणि पेट्रोलने ४८ टक्के टक्के शरीर भाजले होते. पहाटे 3 वाजता घटना घडलेली असतांनाही अर्धवट भाजलेल्या अवस्थेत तरुणी रस्त्या लगत तब्बल १२ तास पडून होती. दुपारी २ वाजता काही वाहनधारकांना आवाज आल्याने त्यांनी खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तरुणी दिसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून अविनाश राजुरे या तरुणाविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. उपचार सुरू असताना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला असून आरोपी अविनाश राजुरेला २४ तासांच्या आता नांदेड पोलिसांनी देगलूर येथून अटक केली आहे.