Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - जगण्याचे सूत्र : बाबासाहेब

प्रजापत्र | Tuesday, 06/12/2022
बातमी शेअर करा

आज बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. आजच्याच दिवशी बाबासाहेब देह रूपाने आपल्यातून गेले, मात्र आज त्यांच्या जाण्याला इतकी वर्ष उलटल्यानंतरही सामान्यांच्या सन्मानाने जगण्याचे सूत्र म्हणून बाबासाहेबांचे अस्तित्व कणाकणात आहेच. आज बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांची आठवण करताना , त्यांनी जो संघर्षाचा, समानतेचा, गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचा विचार दिला तो विचार अधिकाधिक आत्मसात करणे हेच त्यांच्या विचारांना अभिवादन ठरणार आहे.

 

 

ज्या भारत देशात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या किंबहुना व्यवस्थेने अस्पृश्य ठरविलेल्या समूहाला जगण्याचा अधिकार देखील नाकारला जात होता, त्यांची अस्मिता कोणाच्याच खिजगणतीतही नव्हती , त्या समूहामध्ये राजकीय चेतना जागविणारे व्यक्तिमत्व बाबासाहेब होते . बाबासाहेबांनी संविधान लिहिले हेच केवळ त्यांचे मोठेपण नाही, तर त्यांनी या समाजाला खऱ्याअर्थाने सन्मानाने जगण्यासाठी बळ दिले. पिचलेल्या वर्गात स्वाभिमान निर्माण केला. अन्यायाविरुद्ध बोललेच पाहिजे याचा धडा स्वतःच्या कृतीतून दिला. संविधानाचे लेखन हा तसा बाबासाहेबांच्या आयुष्यातील अखेरचा टप्पा आहे, किंबहुना, आपल्या आयुष्यात त्यांनी स्वतः जे भॊगले आणि आपल्या देशातील उपजक्षत समूहांच्या ज्या यातना त्यांनी अनुभवल्या, त्या यातनांचा परिपाक म्हणूनच , सर्वांना दर्जाची आणि संधीची  समानता असेल किंवा प्रवाहाबाहेरच्यांना प्रवाहात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना असतील, त्यांच्या लेखणीतून संविधानात अवतरल्या. पिढ्यांपिढ्यांचा मूकपणा ज्या समूहाला स्वीकारावा लागला होता, त्यांच्या 'अभिव्यक्तीला ' संवैधानिक संरक्षण देण्याचे काम म्हणूनच या 'मूकनायकाने ' केले. बहिष्कृत जनतेला सन्मानाने जगण्यासाठी काय करावे लागते हे सांगण्याचे काम बाबासाहेबांनी केलेले आहे.

 

बाबासाहेबांचे जीवन विश्व इतके व्यापक होते,की त्यांचे कार्य केवळ कोणा एका घटक पुरते मर्यादित राहिलेले नाही. छत्रपती शिवाजी महाएराज, महात्मा फुले , शाहू महाराज यांचा विचार पुढे नेताना, भगवान बुद्धांचे जीवनसूत्र पुहे घेऊन जाताना, अगदी संत तुकाराम महाराजांच्या विचारांना देखील तितकेच महत्व देत महिला, उपेक्षित, कामगार, कष्टकरी , बहुजन आदी सर्वांसाठी त्यांनी उभारलेले काम आजही प्रेरणा देणारे आहे.

 

आज बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने लाखोंचा जनसागर चैत्यभूमीवर जमत आहे. या भूमीतून बाबासाहेबांचे अनुयायी एक प्रकारचे चैतन्य घेऊन निघत असतात. कारण बाबासाहेब हे या बहरतातल्या उपेक्षित, दुर्लक्षित, पीडित समूहांमधले  जगण्याचे चैतन्यच आहेत. म्हणूनच आज त्यांनी जो संघर्षाचा विचार दिला आहे त्याची खऱ्या अर्थाने आठवण ठेवण्याची आवश्यकता आहे.बाबासाहेबानी आपल्या अनुयायांना 'राज्यकर्ती जमात ' होण्याचा सल्ला दिला होता, याचा अर्थ त्यांना आंबेडकरी समुदायातील चार दोन लोकांनी कोणती तरी  सत्तेची पदे मिळविणे इतकेच अपेक्षित नव्हते, तर राज्यकर्ती जमात ही संकल्पना त्यांनी व्यापक अर्थाने वापरली होती. आंबेडकरी समूहाने राजसत्तेवर नियंत्रण मिळवावे , आणि राजसत्ता नियंत्रित करावी, या समूहाने इतकी शक्ती निर्माण करावी, की त्या समूहाच्या इच्छेशिवाय कोणतीच सत्ता मुळात आकारालाच येणार नाही , अशी बाबासाहेबांची संकल्पना होती. म्हणूनच आज याच व्यापक अर्थाने , स्वतःला आंबेडकरवादी म्हणविणारे, मग ते कोणत्या एका जातीचे आहेत असे नाही- कारण मुळातच बाबासाहेबच कोणा एका जातीसाठी नव्हते, जे जे म्हणून उपेक्षित आहेत, बाबासाहेब त्या सर्वांचे होते - त्या सर्वांनी आपण राज्यकर्ती जमात होण्याच्या कोणत्या वळणावर आहोत याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आज ज्यावेळी साऱ्या संवैधानिक यंत्रणा हळूहळू संपविण्याचे षडयंत्र आखले जात आहे, पुन्हा एकदा सामान्यांच्या अधिकारांचे, हक्कांचे हणन करणारी व्यवस्था येऊ पाहत आहे, अभिव्यक्तीसोबतच सामान्यांचे जगणे देखील अवघड केले जात आहे, त्याकाळात बाबासाहेब हेच पुन्हा एकदा आपल्याला आधार ठरणार आहेत म्हणूनच आजही बाबासाहेबांना आपल्या जगण्याचे सूत्र करणे हाच मार्ग वंचित, उपेक्षित आणि सामान्यांसमोर आहे. 
 

Advertisement

Advertisement