Advertisement

आंदोलनासंदर्भाने उच्च न्यायालयाने काय दिले निर्देष  

प्रजापत्र | Tuesday, 26/08/2025
बातमी शेअर करा

मुंबई : ऐन गणपतीच्या तोंडावर मुंबईत धडकणारा मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचा मोर्चा रोखण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या स्वीय सहाय्यकांकडून प्रयत्न करण्यात आले. देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात आली. परंतु मनोज जरांगे मोर्चावर ठाम आहेत. मुंबईसाठी आम्ही रवाना होणारचं असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी (दि.२७) ऑगस्टपासून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मात्र त्याआधी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली आहे.

          मुंबई उच्च न्यायालयाने आज (२६ ऑगस्ट) मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यास मनाई केली आहे. अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्याचवेळी, जरांगे यांना निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे महाराष्ट्र सरकारसाठी खुले आहे, असे खंडपीठाने नमूद केले.  मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. 

Advertisement

Advertisement