नांदेड :ऑनर किलिंगच्या घटनेने नांदेड हादरलं आहे. पित्याने आपल्या पोटच्या मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह चाळीस फूट खोल आणि वीस ते तीस फूट पाणी असलेल्या विहरीत फेकले. धक्कादायक म्हणजे हत्याकरून आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती दिली. जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे ही धक्कादायक सोमवारी (२५ ऑगस्ट) सायंकाळी घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मुलीचा मृतदेह विहरीतून बाहेर काढला, तर मुलाचा शोध सुरुच होता. संजीवणी कमळे (वय १९ वर्ष ) आणि लखन बालाजी भंडारे (वय १९) अशी मयतांची नावे आहेत. दरम्यान या ऑनर किलिंगच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
मयत संजीवनी सुरने ही उमरी तालुक्यातील बोरजुन्नी येथील रहिवासी आहे. एक वर्षापूर्वी गोळेगाव येथील सुधाकर कमळे या मुलासोबत तिचा विवाह झाला होता. कुटुंबियांनी मोठ्या थाटात विवाह केला होता. विवाहापूर्वी संजीवनीचा लखन भंडारे या तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरु होते. लग्नानंतर ही दोघांमध्ये फोनवर बोलणे सुरु होते. सोमवारी सासरचे मंडळी बाहेर गेल्याने संजीवनी हिने आपल्या प्रियकराला घरी बोलवलं. अचानक घरी परतलेल्या पती आणि सासरच्या मंडळींनी दोघांना नको त्या अवस्थेत बघितलं. त्यानंतर संजीवनीच्या पतीने सासरा मारोती सुरने यांना फोन करून बोलावले आणि मुलीला घरी घेऊन जाण्यास सांगितले.मुलीचे वडील मारोती सुरणे, काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे हे तिघेजण मुलीच्या सासरी गोळेगाव पोहचले. गोळेगाव आणि बोरजुन्नी हे आजू बाजूला गावं आहे. पानंद रस्त्यातून या गावाला ये-जा करावं लागतं. आरोपींनी मुलीला आणि तिच्या प्रियकराला घेऊन जात असताना करकाळा शिवारात दोघांना मारहाण करून त्यांची हत्या केली. त्यानंतर चाळीस फूट खोल असलेल्या विहरीत दोघांचे मृतदेह फेकून दिले.
घटनेनंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मुलीचे वडील मारोती सुरणे हे उमरी पोलिस ठाण्यात पोहचून मी मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारून विहरीत फेकले अशी माहिती दिली. माहिती ऐकताच पोलिस देखील चक्रावून गेले. दरम्यान, पोलिस आरोपीला घेऊन घटनास्थळी पोहचले. सायंकाळी सात वाजता मुलीचे प्रेत बाहेर काढण्यात आले तर प्रेमी मुलाच्या प्रेताचा शोध सुरूच आहे.दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस आधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस आधिकारी दशरथ पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी उमरी पो स्टे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळीचा पंचनामा केला. या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात मुलीचे आजोबा लक्ष्मण सुरणे, वडिल मारोती सुरणे आणि काका माधव सुरणे या तिघांना ताब्यात घेतले. ऑनर किलिंगच्या घटनेने खळबळ उडाली आहे.